साडेतीन लाख जण आजही विलगीकरणात

मुंबई : करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तब्बल साडेपाच लाख नागरिकांचा मागोवा घेण्यात मुंबई महापालिके ला यश आले आहे. यातील तब्बल एक लाख ८० हजार नागरिकांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. मात्र आजही साडेतीन लाखांहून अधिक संशयित व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

बाधितांची संख्या वाढत असताना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे आहे. बाधितांच्या केवळ कुटुंबातील सदस्यच नव्हे तर मित्रपरिवार, नातेवाईक अशा संपर्कात येणाऱ्यांचा शोध पालिकेला घ्यावा लागत आहे. आजवर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल पाच लाख ५४ हजार व्यक्तींचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. यापैकी एक लाख ११ हजार व्यक्तींचा अतिजोखमीच्या गटात समावेश होता. यापैकी काही जणांना संस्थात्मक विलगीकरण केंद्र, करोना काळजी केंद्रात ठेवण्यात आले होते, तर काही जणांना घरातच अलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजवर एक लाख ८० हजार संशयितांनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे, तर तीन लाख ७४ हजार करोना संशयित आजही विलगीकरणात आहेत, अशी माहिती पालिकेच्या प्रवक्त्याने दिली.

बाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी करोना काळजी केंद्र-१ उभारण्यात आले आहे. त्यांची क्षमता ३३,८५० खाटा इतकी आहे. या केंद्रांमध्ये अतिजोखमीच्या गटातील ४३,३५६ संशयितांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी २७,७३९ जणांचा विलगीकरण काळ पूर्ण झाला असून करोनाचा धोका टळल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर लक्षणे नसलेले, परंतु चाचणी सकारात्मक आलेल्यांसाठी पालिकेने २९,६२९ खाटांची क्षमता असलेली करोना काळजी केंद्रे-२ सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये आजवर ९,५१३ जणांना दाखल करण्यात आले होते. यापैकी ६,०५७ रुग्णांचा धोका टळल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. आजघडीला या केंद्रांत ३,४५६ जण दाखल आहेत.

१.७० लाख चाचण्या

मुंबईत आतापर्यंत तब्बल १,७०,२४२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताच्या अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे करोना रुग्ण वेळीच सापडून त्यांच्यावर उपचार करणे आणि पर्यायाने संसर्गाचा प्रसार थांबविणे शक्य झाले, असेही या प्रवक्त्याने सांगितले.