08 March 2021

News Flash

साथीच्या आजारांचा ताप

जूनमध्ये मलेरियाचे तीनशेहून अधिक रुग्ण, डेंग्यू-लेप्टोचाही प्रादुर्भाव

महालक्ष्मी रेसकोर्स येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘कोविड रुग्णालया’ची नियमित साफसफाई करण्यात येत आहे. (छायाचित्र : गणेश शिर्सेकर)

जूनमध्ये मलेरियाचे तीनशेहून अधिक रुग्ण, डेंग्यू-लेप्टोचाही प्रादुर्भाव

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : पावसाळा सुरू होताच शहरात हिवताप (मलेरिया), डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे करोनासह आता मुंबईकरांना साथीच्या आजारांनाही तोंड द्यावे लागणार आहे. जून महिन्यात शहरात ३०० हिवतापाचे, चार डेंग्यू आणि एक लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण आढळला आहे. मे महिन्यामध्ये १६३ हिवतापाचे रुग्ण आढळले होते, तर एक लेप्टो आणि सहा डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.

२०१९ च्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात हिवतापाच्या रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे नोंदले गेले. मात्र जूनमध्ये मे महिन्याच्या तुलनेत पुन्हा रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ झाली. २०१९ ला याच काळात हिवतापाचे ३१३ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण कमी प्रमाणात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हिवताप, डेंग्यू आणि करोनाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयात अशी लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या करोनासह या पावसाळी आजारांच्याही चाचण्या केल्या जातात. त्यामुळे योग्य निदान होण्यास मदत होते आणि उपचारही त्या पद्धतीने सुरू केले जातात, असे पालिका रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाच्या(कम्युनिटी मेडिसिन) डॉक्टरांनी सांगितले.

दुहेरी, तिहेरी संसर्गाचा धोका

हिवताप-करोना, मलेरिया, डेंग्यू आणि करोनाचा असे दुहेरी,तिहेरी संसर्ग झाल्याचे ही काही रुग्ण आढळून येत आहेत. एकापेक्षा अधिक संसर्ग एकाच वेळेस झाल्याने प्रकृती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिन्हीवरील उपचार दिले जात असले तरी धोका हा आहेच. तेव्हा ज्याप्रमाणे करोना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. त्याच प्रमाणे हिवताप, डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून मच्छरदाणीचा वापर करणे. तसेच या आजारांचा प्रसार होऊ नये याची काळजीही घेणे महत्त्वाचे असल्याचे पालिका रुग्णालयातील औषधशास्त्र (मेडिसिन) विभागाच्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

साथीच्या आजारांची रुग्णसंख्या

हिवताप            डेंग्यू          लेप्टो

मे २०१९       २८४            ६            १

मे २०२०       १६३            ३             १

जून २०१९     ३१३            ८           ५

जून २०२०      ३२८            ४          १

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 2:16 am

Web Title: more than three hundred malaria patients in june in mumbai zws 70
Next Stories
1 रेल्वेकडे कामगारांचा तुटवडा
2 दूरचित्रवाणी मालिकांमधील ८० टक्के कर्मचारी बेरोजगार
3 ‘गोलार’ रोबोटमार्फत रुग्णांना औषधे, पाणी, जेवणाचा पुरवठा
Just Now!
X