रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चार लाख जणांचा शोध

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल चार लाखांहून अधिक व्यक्तींचा शोध घेण्यात मुंबई महापालिकेला यश आले असून यापैकी ७९ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या, तर सव्वातीन लाखांहून अधिक व्यक्ती कमी जोखमीच्या गटातील आहेत. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या, सौम्य, मध्यम आणि लक्षणे नसलेल्या परंतु करोनाची बाधा झालेल्या अशा तीन लाखांहून अधिक व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबईमध्ये करोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे मृत्युमुखी पडणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचा पालिका कसोशीने प्रयत्न करीत आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या मंगळवारी २२ हजार ६६३ वर पोहोचली असून करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल चार लाख १३ हजार १५९ हून अधिक व्यक्तींचा शोध घेण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. यापैकी ७९ हजार ४९४ जण अति जोखमीच्या गटात, तर तीन लाख ३३ हजार ६६५ जणांचा कमी जोखमीच्या गटात समावेश आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या अति जोखमीच्या आणि कमी जोखमीच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. शौचालयाची व्यवस्था असलेल्या मोठय़ा घरांमध्येही करोना संशयितांना विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सौम्य, मध्यम लक्षणे असलेल्या; लक्षणे नसलेल्या मात्र करोनाची बाधा झालेल्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या चार लाख १३ हजार १५९ पैकी एक लाख २५ हजार ३९१ जणांचा विलगीकरण काळ पूर्ण झाला आहे. तर दोन लाख ८७ हजार ७६८ जणांना आजही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापैकी १७ हजार ३६१ संशयीतांना नुकतेच संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर १८ मेपर्यंत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्यांची संख्या ४१ हजार १९४ इतकी आहे. तर उर्वरित संशयितांना घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

’ करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले – ४,१३,१५९

’ विलगीकरण काळ पूर्ण के लेले – १,२५,३९१

’ सध्या विलगीकरणात असलेले – २,८७,७६८

’ सध्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेले – १७,३६१

’ १८ मेपर्यंत संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेले एकू ण संशयित – ४१,१९४ (यातल्या काही जणांना घरी पाठवण्यात आले आहे.)