येत्या चार दिवसांत संख्या आणखी वाढणार

येत्या २ सप्टेंबरला मुंबईसह देशभरात मोठय़ा उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने देवनारच्या पशुवधगृहात सोमवापर्यंत दीड लाख बकऱ्यांची आवक झाली आहे. तर येत्या चार दिवसात हा आकडा दोन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता येथील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

६४ एकर जागेत वसलेल्या देवनार पशुवधगृहात या वर्षी ४० हजार चौरस मीटर जागा खास बकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा विविध राज्यातून या ठिकाणी बकऱ्यांच्या विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना देखील याच ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विजेची सुविधाही या ठिकाणी पुरवण्यात आली आहे. दरवर्षी या ठिकाणी बकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात चोरी होत असल्याने चोरीचे प्रकार थांबवण्यासाठी तीनशे सुरक्षारक्षक या ठिकाणी तनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांसाठी देखील या ठिकाणी १३ मंडप आणि सात वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.

ईद जवळ येताच विविध राज्यांमधून व्यापारी बकरे घेऊन या ठिकाणी दाखल होत असतात. त्यानुसार सोमवापर्यंत या ठिकाणी १ लाख ४५ हजार ५४२ बकऱ्यांची आवक झाली आहे. तर यातील २५ हजार ३६२ इतक्या बकऱ्यांची सोमवापर्यंत विक्री झाली आहे. ईदला आणखी चार दिवस बाकी असल्याने या वर्षी या ठिकाणी हा आकडा दोन लाखांच्या वर जाण्याची शक्यता देवनार पशुवधगृहातील महाव्यवस्थापक योगेश शेट्टे यांनी वर्तवली आहे.

धार्मिक वधाचीही व्यवस्था

पशुवधगृहातून बकरे खरेदी केल्यानंतर ग्राहक आपापल्या घरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देतात. मात्र काहीं जणांना घरी कुर्बानी देण्यासाठी अडचण असते. निवासी संकुलात शेजाऱ्यांकडून आक्षेप घेतल्याने तणावाचे प्रसंगही उद्भवतात. त्यामुळे पालिकेने याच पशुवधगृहात धार्मिक कुर्बानीची देखील सोय केली आहे. याशिवाय कुर्बानीसाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी पालिकेने खास मोबाइल अ‍ॅप देखील तयार केले असून संबंधित व्यक्तीने त्याची माहिती या अ‍ॅपमध्ये भरल्यास त्याला तत्काळ कुर्बानीसाठी पालिकेकडून परवानगी देखील मिळते.