लोकलमधून उतरून बालिकेला उचलले; जीआरपी कर्मचाऱ्यांकडे ताबा
दादर स्थानकाजवळ रेल्वे मार्गात आलेल्या एका चिमुरडीचे प्राण पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखविल्यामुळे वाचले. इतर गाडय़ांचा खोळंबा होऊ नये, यासाठी चिमुरडीला जीआरपीच्या ताब्यात देऊन मोटरमनने लोकलचा ताबा घेतला.
मोटरमन मुनेश कुमार कुलश्रेष्ठ नेहमीप्रमाणे शनिवारी कर्तव्यावर होते. अप धिम्या मार्गावरील ९१०३८ बोरिवली-चर्चगेट गाडीचे ते सारथ्य करीत होते. दादर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर रुळावर हालचाल सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ त्यांनी लोकलचा वेग कमी केला. गाडी पुढे सरकताच त्यांना रुळावर एक लहान मुलगी असल्याचे दिसते. गाडी हळूहळू मुलीजवळ जाऊन थांबली. तात्काळ लोकलमधून उतरून कुलश्रेष्ठ यांनी त्या मुलीची विचारपूस केली. परंतु, त्या मुलीला बोलता येत नव्हते. मुलगी बोलत नसल्याचे लक्षात येताच कुलश्रेष्ठ यांनी तिला महिला डब्यातील जीआरपी कर्मचाऱ्यांकडे सोपविले. मध्येच लोकल थांबविल्याने अन्य गाडय़ांचा खोळंबा होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुलश्रेष्ठ यांनी तात्काळ लोकलचा ताबा घेतला आणि ते पुढच्या रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले.
रेल्वे चर्चगेट स्थानकात आल्यानंतर कुलश्रेष्ठ हे जीआरपी कर्मचाऱ्यासह मुलीला घेऊन जीआरपीच्या मुख्य कार्यालयात आले. तेथे त्यांनी मुलीला जीआरपी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.
कुलश्रेष्ठ यांचे कौतुक
कुलश्रेष्ठ यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, या मुलीच्या पालकांचा शोध सुरू असून पालक सापडताच मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.