24 September 2020

News Flash

अंधेरी, धारावी, दादर, माहीममध्ये सर्वाधिक मृत्यू

मुंबईत गणेशोत्सवापूर्वी काही दिवस आधी मृत्यू दर कमी होऊ लागला होता.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : अत्यंत दाटीवाटीचा धारावी परिसर करोना रुग्णांचे आकडे आणि मृत्यूंची संख्या यामुळे सुरुवातीच्या काळात कायम चर्चेत राहिला असला तरी या परिसराला लागून असलेल्या आणि ‘जी-उत्तर’ विभागात येणाऱ्या दादर-माहीममध्येही मृत्यूंची नोंद वाढते आहे. जी-उत्तरमध्ये आतापर्यंत ५३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दादरमध्ये १३४, माहीममध्ये ११०, तर धारावीत २८८ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

या विभागातील ५३२ मृत्यूंपैकी २३० रुग्णांचा मेमध्ये मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू (१६१) धारावीतील होते. आता येथील मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आले. जूनमध्ये ९६, जुलैमध्ये ६५, ऑगस्टमध्ये ५३, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे बहुतांश मृत्यू दादर-माहीम या मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागात आहेत.

मुंबईत ‘के-पूर्व’ (विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व) भागात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तोकडी वैद्यकीय सेवा, करोनाविषयीची भीती, रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, दीर्घकालीन आजार आदी विविध कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जाते.

मुंबईत गणेशोत्सवापूर्वी काही दिवस आधी मृत्यू दर कमी होऊ लागला होता. आजघडीला प्रतिदिन साधारण ३० ते ४५ व्यक्तींचा मृत्यू होत आहे. दरम्यान, करोनाची भीती, रुग्णालयात वा करोना केंद्रात दाखल रुग्णांचा नातेवाईकांशी होत नसलेला संपर्क, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, वयोमान आदी विविध कारणांमुळे करोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

करोनामुळे ‘के-पूर्व’ म्हणजे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरीच्या पूर्व भागामध्ये सर्वाधिक म्हणजे ५६२ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याखालोखाल दादर, माहीम, धारावीचा समावेश असलेल्या ‘जी-उत्तर’ विभागात ५२४  तर भांडुपमध्ये ४९१, कुल्र्यामध्ये ४७५, घाटकोपरमध्ये ४३०, एल्फिन्स्टनमध्ये ४२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालये अधिक म्हणून नोंद जास्त

‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत सेवन हिल्स रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालय, करोना केंद्रे आहेत. तसेच ‘जी-उत्तर’ विभागातही छोटी-मोठी खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद तेथील विभागात झाली आहे. परिणामी या दोन विभागांमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी दिसत आहे, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कुलाब्यात कमी मृत्यू

मुंबईच्या एका टोकाला असलेल्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील म्हणजे कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज परिसरात सर्वात कमी म्हणजे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. अन्य विभागांच्या तुलनेत ‘बी’ म्हणजे सॅण्डहर्स्ट रोड आणि परिसरात कमी म्हणजे ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 2:46 am

Web Title: most coronavirus deaths recorded in andheri dharavi dadar and mahim zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 बेस्टच्या ताफ्यात विजेवरील आठ बसगाडय़ा
2 महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्राची सामग्री हटवली
3 बंगाली भाषकांची यंदा मूर्तिपूजेऐवजी घटपूजा
Just Now!
X