मुंबई महापालिके कडून कामाला गती

मुंबई: मुंबईत सप्टेंबरमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेलेली आहे तशीच या महिन्यात चाचण्यांची संख्याही मुंबई महापालिकेने वाढवली आहे. या एका महिन्यात पावणे चार लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांशी तुलना केल्यास एका महिन्यातील या सर्वात जास्त चाचण्या आहेत.

ऑगस्टमध्ये करोनाच्या रुग्णवाढीचा दर एकदम कमी झाला होता. त्यावेळी करोना नियंत्रणात येत असल्याबाबत आशा निर्माण झालेली असतानाच सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या वाढू लागली. याच काळात मुंबई महापालिकेने दिवसभरातील करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले. दिवसभरात सध्या दिवसभरात १३ ते १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच जलद निकाल देणाऱ्या प्रतिजन चाचण्यांचाही समावेश आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे मोठय़ा संख्येने रुग्णांची नोंद होऊ लागली आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले होते. काही विभागांना चाचण्यांचे लक्ष्य ठरवून दिले होते. त्यामुळे २४ विभागात आरोग्य शिबिरे भरवून तसेच पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर दुकानदार, फेरीवाले यांच्याही चाचण्या काही भागांमध्ये केल्या जात आहेत.

दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ला मुंबईत पहिली करोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या तीन महिन्याच्या कालावधीत एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जूनला दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार केला. त्यानंतर २४ जून रोजी ३ लाख चाचण्या पार पडल्या. १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्या पूर्ण केल्या. २९ जुलै पर्यंत ५ लाख चाचण्या पार पडल्या होत्या. तर २३ ऑगस्टला चाचण्यांची संख्या ७ लाख झाली होती. तर २९ सप्टेंबपर्यंत हीच संख्या ११ लाखाच्या पुढे गेली आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंतच्या ११.४४ लाख चाचण्यांपैकी निम्म्या म्हणजेच ५२ टक्के चाचण्या या केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील आहेत. या दोन महिन्यात ५.८० लाख चाचण्या करण्यात आल्या. मे महिन्यात दर दिवशी सरासरी ३८७२ चाचण्या करण्यात येत होत्या. तर जूमध्ये हीच संख्या ४४२२ वर गेली होती. जुलै मध्ये दर दिवशी सात हजार चाचण्या केल्या जात होत्या. तर सप्टेंबरमध्ये दर दिवशी सरासरी ११ हजार चाचण्या केल्या जात आहेत.

११,४४,७४४..   आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्या

२,०७,४९४ (१८.१३ टक्के).. बाधित