शैलजा तिवले

पायाभूत सुविधांविनाच वाढते शहरीकरण, अनियमित पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव देशात गेल्या पाच वर्षांत जवळपास तिपटीने वाढल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालावरून स्पष्ट झाले आहे. २०१७ पाठोपाठ २०१८ मध्येही देशभरात सर्वाधिक डेंग्यूबळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही पाच वर्षांत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला फारसे यश आलेले नसल्याचे अहवालावरून दिसते.

या अहवालानुसार, देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव १९५० पासून आहे. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले. देशात २०१४ मध्ये जवळपास ४० हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. २०१८ मध्ये हा आकडा एक लाखाच्याही वर पोहोचला. राज्यात २०१४ पासून डेंग्यूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला. देशातील डेंग्यूच्या एकूण बळींपैकी जवळपास २० टक्के बळींची नोंद राज्यात झाली. त्यापाठोपाठ तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, गोवा या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये डेंग्यूच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कर्नाटकला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये या राज्यात डेंग्यूचे रुग्ण आणि मृत्यू यामध्ये अनुक्रमे ७५ टक्के आणि ६० टक्क्यांनी घट झाली. चिकनगुनियाचे प्रमाणही राज्यात २०१४ पासून २०३ वरून २०१८ पर्यंत १ हजारावर पोहचले आहे.

२०१५ पासून डेंग्यूची अधिसूचित आजार अशी नोंद केल्याने खासगी रुग्णांच्याही नोंदणीस सुरुवात झाली. त्यामुळेही रुग्णसंख्येत भर पडली आहे. अनियमित पाऊस, सातत्याने वातावरण बदल हे घटक यासाठी कारणीभूत आहेत. डेंग्यूचा फैलाव वाढल्यानंतर चिकनगुनियाही वाढण्याची शक्यता असते. आतापर्यंत चिकनगुनिया प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळत होता. परंतु, हा आजार शहरी भागांतही दिसून येतो. शहरे विस्तारताना आरोग्याच्या पायाभूत सुविधा मात्र अपुऱ्या पडतात. विकासकामांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास अजूनही केला जात नाही.

– डॉ. प्रदीप आवटे, प्रमुख, राज्य साथरोग नियंत्रण विभाग