पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्ला
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून नेहमी काँग्रेस सरकारला दोष दिला जायचा, पण गेल्या वर्षी भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याची आकडेवारीच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हवाल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी होताना चव्हाण यांनी शेतकरी आत्महत्या, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या माध्यमातून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. २००८ मधील कर्जमाफीनंतर २०१२ मध्ये राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी दिली होती. परंतु केंद्रीय कृषिमंत्री राधेमोहन सिंग यांनी संसदेत सादर केलेल्या माहितीत २०१५ या वर्षांत सर्वाधिक ३२२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

रोजगार किती जणांना?
मेक इन इंडियाच्या जाहिरातींमध्ये केंद्र वा राज्य सरकार या दोघांनीही ३० लाख रोजगार मिळणार, असा दावा केला आहे. राज्य सरकारने आठ लाख कोटींचे तर संपूर्ण देशात १५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचे सांगण्यात आले. उभयतांच्या जाहिरातींमध्ये ३० लाख रोजगाराचा आकडा दाखविण्यात आला आहे. नक्की किती जणांना रोजगार मिळणार, असा सवाल त्यांनी केला.