पंधरा दिवसांत शहरात सर्वाधिक वृक्ष कोसळले

मुंबई : फुलांनी बहरलेल्या गुलमोहराच्या सौंदर्याची भुरळ सर्वानाच पडते. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर, सोसायटय़ांच्या आवारात, बागेत गुलमोहराची झाडे आवडीने मोठय़ा संख्येने लावली गेली. मात्र शहराचे हवामान मानवले नसल्याने आणि मुळांवर सिमेंट-काँक्रीटचे थर चढल्याने अशक्त झालेल्या गुलमोहरांची झाडे गेल्या काही वर्षांत मोठय़ा संख्येने पडत आहेत.  वर्षभरात झाड पडल्याने झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू गुलमोहराच्या झाडाखाली झाले असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेने गुलमोहराची झाडे लावणे पाच वर्षांपूर्वीच बंद केले असले तरी या झाडांच्या आरोग्याकडे व छाटणीकडे लक्ष देण्यासाठी वृक्षतज्ज्ञ नेमणे गरजेचे बनले आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग

शहरात देशी वृक्ष लावण्यास प्राधान्य देण्याचा प्रकार गेल्या पाच वर्षांमधील. मात्र त्याआधी रस्त्यांवर, बागेत सुंदर, वेगळी दिसणारी विदेशी झाडे लावण्यात आली. गुलमोहर हा त्यापैकीच एक. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या लाल रंगांच्या फुलांनी सर्वानाच मोहिनी घातली. मात्र या झाडांसाठी आवश्यक असलेली कोरडी हवा मुंबईत नसल्याने  या झाडांच्या वाढीवर मर्यादा आल्या. त्यातच रस्त्यावर त्यांच्या खोडाभोवती पडलेला डांबराचा, सिमेंट-काँक्रीटचा फास यामुळे गळचेपी झालेली ही झाडे आता पावसातील सोसाटय़ाचा वारा सहन न झाल्याने माना टाकत आहेत.

गुलमोहराचे झाड प्रखर उष्णता आणि कोरडय़ा हवेत वाढते. मुंबईतल्या दमट हवेत त्याला हवेतील बाष्पामधूनच पाणी मिळत असल्याने त्याची मूळ जमिनीत खोलवर जात नाहीत. त्यामुळे सोसाटय़ाच्या वाऱ्यात ही झाडे पडण्याचे प्रमाण अधिक आहे. जूनमधील पावसात पडलेल्या १९९ झाडांमध्ये ३५ ते ४० झाडे गुलमोहराची आहेत. झाडांच्या फांद्या पडण्यामध्येही गुलमोहराचे प्रमाण अधिक आहे, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले. गेली पाच वर्षे शहरात गुलमोहराची झाडे लावणे बंद करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी ही झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली होती. त्या झाडांबाबत सध्या काही करता येण्यासारखे नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटते.

गुलमोहराच्या झाडांची मुळे ही जमिनीलगत पसरतात. त्यातच अनेक झाडांच्या खोडांभोवती सिमेंट काँक्रीटने बांधकाम केले जाते. त्यामुळे मुळांना पाणी, माती, खत काहीच मिळत नाही आणि ही झाडे कमकुवत बनतात. बागांमध्ये लावलेली झाडे ही त्यामानाने जास्त टिकतात. या झाडांची योग्य निगा राखली पाहिजे, तसेच पावसाळ्याआधी त्यांची योग्य छाटणी झाली पाहिजे. छाटणी करताना कंत्राटदारांसोबत पालिकेचे वृक्षअधिकारी हवेत. मात्र तसे होत नसल्याने ही झाडे मोठय़ा प्रमाणात पडतात, असे वृक्षतज्ज्ञ चंद्रकांत लट्टू म्हणाले. काही वर्षांपूर्वी पांगारा झाडे खूप संख्येने पडत होती. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. गुलमोहर आणि पांगारा ही झाडे लावणे आता कमी झाले असले तरी झाडांची निगराणी राखण्याबाबत महापालिकेकडून प्रयत्न केले जात नाही. प्रत्येक विभागात किमान दोन ते तीन वृक्षतज्ज्ञांची नेमणूक झाली पाहिजे. मात्र पालिका झाडांची छाटणी करण्याचे काम केवळ कंत्राटदारांवर सोपवून मोकळी होते, त्यात अनेकदा चांगली झाडे तोडली जातात, पालिकेने प्रयत्न केले तर गुलमोहराची झाडे पडण्याचे किंवा त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करता येईल, असे पर्यावरणतज्ज्ञ ऋषी अग्रवाल यांनी सांगितले.

धोक्याचे स्वरूप..

शहरात गेल्या १५ दिवसांत पडलेल्या १९९ झाडांपैकी ३५ ते ४० झाडे गुलमोहराची आहेत, तर गेल्या वर्षभरात झाड किंवा फांदी पडून मृत्यू झालेल्या आठ घटनांपैकी पाच घटनांमधील मृत्यू गुलमोहराच्या झाडामुळे झाले आहेत. झाडांच्या फांद्या पडण्यामध्येही गुलमोहराचे प्रमाण अधिक असते.

झाड दुर्घटना

* ६ जून २०१७ – नेव्ही नगरमध्ये राहुल विपिन कुमार या १४ वर्षांच्या मुलाचा गुलमोहराचे झाड पडून मृत्यू.

* १ जुलै २०१७ – बोरिवली येथील रामनगर मार्गावर रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून ६७ वर्षांच्या राजमणी यादव यांचा मृत्यू.

* ६ डिसेंबर २०१७- चेंबूर येथील डायमंड गार्डनबाहेर बसथांब्यावर असलेल्या शारदा घोडेस्वार यांचा गुलमोहराचे झाड पडून मृत्यू.

* १९ एप्रिल २०१८ – दादर पूर्वमध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय रस्त्यावरून गुलमोहराचे झाड पडून दिनेश सांगळे यांचा मृत्यू.

* १६ जून २०१८ – अंधेरी पश्चिम येथे गुलमोहराच्या झाडाची फांदी पडल्याने ५० वर्षांच्या यश देसाई यांचा मृत्यू.

* ९ जून २०१८ – दादर पश्चिम येथे राम मारुती रोडवर गुलमोहराचे झाड पडून २० वर्षांची श्रेया राऊत गंभीर जखमी.

* १ ते १८ जून २०१८..

* पडलेली झाडे – १९९ (पालिका क्षेत्रातील ४६, खासगी परिसरातील १५३)

* मोठय़ा फांद्या तुटलेली झाडे – ५३४ (पालिका क्षेत्रातील १८२, खासगी परिसरातील ३५२)