अंधेरीतील बाधितांपैकी ९७० जण अत्यावश्यक सेवेतील, इतरही विभागांत लक्षणीय संख्या

मुंबई : मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा सर्वात जास्त असला तरी यामध्ये मोठय़ा प्रमाणावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. पोलिस, रुग्णालय कर्मचारी, बेस्टचे कामगार, डॉक्टर, पालिका कर्मचारी, सफाई कामगार असे करोनाच्या पहिल्या फळीतील कामगार यांची मोठी संख्या असून ते मोठय़ा प्रमाणावर बाधित होत आहेत.

मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा रोज वाढतो आहे. एकूण बाधितांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. प्रत्येक विभागात दोन, अडीच, तीन हजार लोक बाधित आहेत. मात्र या बाधितांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. सुरुवातीला केवळ परदेशवारी करून आलेल्या आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत म्र्यादित असलेला करोनाच्या संसर्ग अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पसरला आहे. त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना याची लागण होते आहे. असेच चित्र सर्वच विभागात आहे. सेवा बजावताना त्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुंबीयांना व इतरांना लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळले आहेत त्यांच्या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की ३० ते ६० या वयोगटातील रुग्ण ७५ टक्के आहेत. यातील बरेसचे रुग्ण हे अत्यावश्यक सेवेत काम करणारेच आहेत. त्यामुळे त्यांचा या आजाराशी रोजच जवळून संबंध येतो.

अंधेरी पूर्व भागात सध्या मुंबईत सर्वात जास्त चार हजाराहून अधिक रुग्ण आहेत. मात्र त्यात ९७० अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेच्या के पूर्व विभागात दोन विमानतळे, एमआयडीसी आणि सिप्झसारख्या औद्योगिक वसाहती, मरोळ पोलीस वसाहत आणि सीआयएसएफ कॅम्पसारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवेतील कर्मचारी, ओएनजीसी कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्थाही के पूर्व विभागातील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. सेव्हन हिल आणि जोगेश्वरी ट्रॉमा केअर ही दोन रुग्णालये याच भागात असून त्यामध्ये कार्यरत कर्मचारी याच वॉर्डमध्ये वास्तव्याला आहेत. यातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल बाधित आले आहेत, तर त्यांच्या संपर्कातील काहींना ही करोनाची बाधा झाली आहे. तसेच हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमुळे हॉटेलमधील कामगार बाधित झाले आहेत. परिणामी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळेही के पूर्व विभागातील करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, असे वॉर्डचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

एफ (साऊथ ) वॉर्ड (दादर, परळ) येथील सुमारे तीन हजार बाधितांपैकी ५० टक्के  वैद्यकीय सेवेतील  आहेत. बोरिवलीचा भाग असलेल्या आरमध्ये विभागातही अशीच परिस्थिती आहे. या भागात इतर मुंबईच्या तुलनेत रुग्ण कमी असले तरी निम्म्या संख्येने रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील विशेषत: पालिकेचे कर्मचारी आहेत. या भागात सध्या १५५१ रुग्ण असून ७०० हून अधिक रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेचे बहुतांशी कर्मचारी, डॉक्टर हे बोरिवलीतील रहिवासी आहेत.

धारावीत आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांमध्येही अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाची संख्या ७५ टक्के आहे. सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणारे कामगार अशा बाधितांचा यात समावेश आहे. नानाचौक, ग्रॅंटरोड भागातही जसलोक, भाटिया, वोकहार्ट, ब्रीच कॅण्डी अशी खासगी रुग्णालये असून त्यांचे कर्मचारी याच भागात राहणारे आहेत. त्यांच्यातही बाधितांचे प्रमाण मोठे आहे.

रेल्वेच्या ११२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

पश्चिम, मध्य रेल्वेबरोबरच अन्य रेल्वे विभागातील ११२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. २ जूनला रेल्वेतील करोना रुग्णांची हीच संख्या ७९ होती.  मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. सध्या मध्य रेल्वेचे ६६, तर पश्चिम रेल्वेचे ४४ कर्मचारी करोनाग्रस्त आहेत, तर पश्चिम मध्य रेल्वेच्या विभागाचाही एक आणि नॉर्थ फ्र ंटायर रेल्वेच्याही एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी आणखी २९ संशयित रुग्ण असल्याची माहिती दिली. यात मध्य रेल्वेचे १२ आणि पश्चिम रेल्वेचे १७ रुग्ण आहेत. आतापर्यंत रेल्वेचे एकू ण ३४३ कर्मचारी बरे झाले आहेत.

बाधितांची संख्या

९०३२              २० ते ३० वर्षे

११,०१७          ३० ते ४० वर्षे

११,१८८          ४० ते ५० वर्षे

१२,००६          ५० ते ६० वर्षे