करोनाकाळातील नियम, स्थानिक प्रशासनाच्या बंधनांचा परिणाम

मुंबई : नववर्षांच्या पूर्वसंध्येला गिरीभ्रमण करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले, पण यंदा यास उतरती कळा लागली आहे. काही हौशी वगळता बहुतांश ट्रेकर्सने यंदाचे डोंगर भटकं तीचे बेत रद्द केले आहेत. जमावबंदी, स्थानिक प्रशासनाचे नियम अशा परिस्थितीत भटकं ती करणे जोखमीचे असल्याने नववर्षांचे स्वागत घरूनच करण्याकडे ट्रेकर्स मंडळींचा कल आहे.

नवीन वर्षांची सुरुवात निसर्गरम्य ठिकाणी व्हावी यासाठी अनेक जण ३१ डिसेंबरच्या रात्री डोंगरमाथ्यांवर भटकं तीसाठी जातात. वर्षांचा शेवटचा दिवस आणि नववर्षांची सुरवात गिरीभ्रमणाने व्हावी, असा ट्रेकर्सचा मानस असतो. परंतु या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला गर्दी होऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या र्निबधांमुळे ट्रेकिंग करणे अवघड  झाल्याचे काही ट्रेकरनी सांगतिले.

काही मोजक्या प्रसिद्ध किल्ल्यांच्या परिसरात काही वर्षांपासून मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील बरीच वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून डोंगरपायथ्याच्या गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाकडून ३१ डिसेंबरला बंदीच घातली जाते. यंदा हे नियमदेखील अनेक ठिकाणी कडक करण्यात आले आहेत.

‘गिरीभ्रमण आणि कॅम्पिंग यात फरक आहे. कॅम्पिंगसाठी आजही बरीच मंडळी बाहेर पडली आहेत, पण यात ट्रेकर्सचे प्रमाण कमी आहे. हल्ली ट्रेकिंगच्या नावाने गैरवर्तन करण्याचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ मंडळी सजग झाले आहेत. त्यामुळे सगळ्याच बाजूने बंधने असल्याने वर्षांअखेरीचे ट्रेकिंग होणार नसल्याचे,’ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष  उमेश झिरपे यांनी सांगितले.

वर्षअखेरच्या निर्बंधांची कल्पना असल्याने अनेकांनी २५ ते २७ डिसेंबर या जोडून आलेल्या सुट्टीतच गिरीभ्रमण उरकू न घेतले. तर हरिश्चंद्र, भंडारदरा, माहुली, जुन्नर अशा प्रसिद्ध ठिकाणी वनविभागाने परवानगी नाकारली आहे. ‘पूर्वी ३१ डिसेंबरला ट्रेकर्स आवर्जून जात होते, पण हल्ली सगळ्यांमध्येच हे लोण पसरले आहे. त्यामुळे ट्रेकर्सपेक्षा या हौशी मंडळीचीच गर्दी अधिक असते,’ असे ‘ट्रेक क्षितिज’चे अध्यक्ष राहुल मेश्राम यांनी सांगितले.  पुणे, कोल्हापूर वगळता बरीचे ठिकाणे, किल्ले यांवर अद्याप परवानगी नाही. शिवाय सध्याचा काळ कठीण असल्याने आपल्यापासून कुणाला धोका निर्माण होईल असे वर्तन टाळायला हवे. त्यामुळे यंदा शासनाला सहकार्य करू या, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक सुविधांच्या मर्यादा

त्याचबरोबर वाहतूक सुविधांच्या मर्यादांमुळे गिरीभ्रमंतीच्या खर्चात वाढ झाली आहे. ‘गिरीभ्रमण कमी खर्चात कसे होईल याकडे आमचा कल असतो. सध्या रेल्वे प्रवासाला असलेली मर्यादा आणि खासगी गाडय़ांचे अवास्तव भाडे यांमुळे प्रवासाचे आर्थिक गणित कोलमडले. तसेच तिथे जाऊन राहणार कुठे, खाणार काय हाही प्रश्न आहे. आजूबाजूच्या वातावरण पाहून घरातूनही अनेकांना परवानगी मिळत नाही, असे सिटी नेक्स्ट डोअर संस्थेचे दीपेश वेदक यांनी सांगितले.