मर्यादित साठय़ामुळे अनेक केंद्रे बंद; दुसरी मात्रा घेऊ इच्छिणाऱ्यांचीही निराशा

मुंबई : येत्या १ मेपासून देशभरातील १८ वर्षांखालील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार असल्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत असताना मुंबईतील सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. सध्या पुरेसा लससाठा नसल्यामुळे मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून दुसरी मात्रा घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना निर्धारित काळ लोटल्यानंतरही लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, मंगळवारी रात्री पालिके ला एक लाख १० हजार मात्रा मिळाल्या असून त्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबई आणि उपनगरात गेले दोन आठवडे असलेला लशीचा तुटवडा अद्यापही संपलेला नाही. लशीची उपलब्धता अद्यापही सुरळीत झालेली नाही. अपुऱ्या लससाठय़ामुळे तब्बल ३१ खासगी लसीकरण केंद्रे सोमवारी बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर मंगळवारी एकूण ४९ केंद्रे बंद ठेवावी लागली. त्यात पालिके च्या व सरकारी केंद्रांचाही समावेश होता. बुधवारीदेखील अनेक ठिकाणी दुसऱ्या सत्रातील लसीकरण होऊ शकले नाही.  दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिके ने ठेवले आहे. पालिके च्या केंद्रांवर गेल्या आठवडय़ापर्यंत ४० ते ५५ हजारांपर्यंत लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र गेल्या आठवडय़ात लससाठय़ाअभावी दिवसाला ३५ हजारांपर्यंत लसीकरण होऊ शकले.

परिस्थिती काय?

बीकेसी लसीकरण केंद्रांवर दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत आहे. या केंद्रावर मंगळवारी केवळ चारशेच मात्रा शिल्लक असल्याने लोकांना घरी परतावे लागले. यातील अनेकजण बुधवारी पुन्हा लस घेण्यासाठी आले आणि बुधवारी नव्याने लस घ्यायला आलेल्या लोकांची संख्याही अधिक असल्याने यंत्रणेवर अधिक ताण आल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. बीकेसी केंद्राला बुधवारी कोविशिल्डच्या १२ हजार मात्रा मिळाल्या. सध्या दिवसाला २ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण बीकेसी केंद्रावर सुरू असल्याने हा साठा केवळ चार ते पाच दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या ‘कोवॅक्सिन’ लस केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच दिली जात आहे. तर उर्वरित सगळ्यांना ‘कोविशिल्ड’ लस दिली जात आहे.  गोरेगावच्या नेस्को येथील केंद्रावर के वळ दुसरा डोस घ्यायला आलेल्यांनाच लस दिली जात होती. मात्र लोक मोठय़ा संख्येने लस घेण्यासाठी येत असल्यामुळे पहिल्यांदा लस घ्यायला आलेल्यांना परत पाठवले जात होते. अनेक केंद्रावर दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस मिळू शकली नाही.

धारावीत लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार 

धारावीत लसीकरणाबाबत सुरू केलेल्या जागृती अभियानाचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी वाढतेच आहे. परंतु जागेअभावी दिवसाला १ हजार लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवलेल्या धारावी केंद्रावर सध्या केवळ ५०० नागरिकांनाच लस दिली जात आहे. ‘नागरिकांचा प्रतिसाद उदंड आहे, परंतु लसीकरण केंद्रावरील जागा अपुरी पडत असल्याने लसीकरण संख्या वाढवण्यावर मर्यादा येत आहे,’ अशी माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. ‘सध्याची गर्दी पाहता १ मेपासून जेव्हा सगळ्यांसाठी लसीकरण सुरू होईल तेव्हा प्रतिसाद आणखी वाढेल. त्यादृष्टीने आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्याचीही तयारी सुरू आहे,’ असे जी- उत्तर चे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

१ मेपासून ताण वाढणार

येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्यात येणार असले तरी त्यासाठी पुरेसा लससाठा उपलब्ध होऊ शके ल की नाही याबाबत मात्र साशंकता आहे. १८ वर्षांवरील सर्वानाच लस द्यायची झाल्यास त्याकरिता पालिके ला केंद्र वाढवावी लागणारी आहेत. मात्र, लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही तर केंद्रावरील ताण अधिक वाढणार आहे.

प्रत्येक विभागात केंद्र

पालिके च्या २४ विभागांपैकी प्रत्येक विभागात चार केंद्रे वाढवण्याचा पालिके चा विचार आहे. केंद्र सरकारने पालिके च्या दवाखान्यातही आता केंद्र सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे त्यादृष्टीनेही विभाग कार्यालयांनी प्रयत्न सुरू के ले आहेत. तसेच अनेक केंद्रांना मनुष्यबळ घेण्याचेही अधिकार देण्यात आले आहेत.

४० लाख       मुंबईतील ४५ वर्षांवरील नागरिक

२०,४३,०००    आतापर्यंत लसीकरण

२,७६,०००       दोन्ही मात्रा पूर्ण  (६.९ टक्के)

१२९  एकण केंद्रे  (पालिका -३९, केंद्र व राज्य सरकार १७, खासगी ७३)