News Flash

तुटवडा कायम अन् गर्दीही..

एकीकडे लसीकरण केंद्रांची थाटात उद्घाटने; लसीकरण केंद्रांवर मात्र ठणठणाट

लस घेण्यासाठी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली होती.

एकीकडे लसीकरण केंद्रांची थाटात उद्घाटने; लसीकरण केंद्रांवर मात्र ठणठणाट

मुंबई : करोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम राहिल्याने बुधवारीही मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली. मात्र नेहमीप्रमाणे याबाबत नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात न आल्याने या केंद्रांवर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व नागरिकांना दुपापर्यंत थांबूनदेखील लशीशिवाय परतावे लागले. एकीकडे हा गोंधळ सुरू असताना महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये नवीन लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे ढोल बडवले जात होते.

पालिकेने प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर मंत्री, नेते यांना बोलवून नगरसेवकांनी केंद्रांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्यासह नेतेमंडळींच्या उपस्थितीत बुधवारीही मुंबईतल्या विविध भागांत लसीकरण केंद्रांची उद्घाटने सुरू होती. मात्र त्याचवेळी अ‍ॅपच्या त्रुटींशी झटापट करून नोंदणी केलेल्या अनेकांना लस उपलब्ध न झाल्याने मिळू शकली नाही.

वरळीतील पोद्दार रुग्णालयातील लसीकरण केंद्राला बुधवारी केवळ २५० मात्रा मिळाल्या होत्या. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हा साठा संपला. त्यामुळे केंद्र बंद करावे लागले. परिणामी, अ‍ॅपमध्ये नोंदणी करूनही अनेकांना लस मिळाली नाही. तर दुपारी ३ ते ५ वेळ आरक्षित केलेल्यांनाही सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावरूनच हाकलून दिले. वरळीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात लशींचा साठा मिळाला नव्हता. त्यामुळे आधीच्या शिल्लक  मात्रा नागरिकांना देण्यात आल्या. दादरच्या कोहिनूर येथील लसीकरण केंद्रावर नागरिक मंगळवारी सकाळी ७ पासून उभे होते. आता लस मिळेल, मग लस मिळेल या आशेवर दुपारी १२ वाजेपर्यंत थांबले होते. परंतु लस न मिळाल्याने परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. वसई, ठाणे, मुलुंड येथूनही अनेकजण लस घेण्यासाठी आले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. वांद्रे येथील काही महिला मंगळवारी दुसरी मात्रा घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बुधवारी येण्यास सांगितले. बुधवारी सकाळी ८ पासून रांगेत उभे राहूनही त्यांना लस मिळाली नाही. नारायण जगवानी हे लशीची दुसरी मात्रा घेण्यासाठी चेंबूर येथून वरळीतील पोद्दार रुग्णालयात आले होते. दुपारी ३ ते ५ ही वेळ त्यांना देण्यात आली होती. ‘घरापासून सुमारे एक ते दीड तासांचा प्रवास करून करोनाचा धोका असतानाही लस घेण्यासाठी आलो. आता लससाठा संपल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता पुढील वेळी तरी अ‍ॅपमध्ये योग्य माहिती द्या,’ असे जगवानी यांनी सांगितले.

निकटवर्तीयांना थेट प्रवेश

वांद्रे येथील गॉडविन आपल्या आईला घेऊन सकाळी ७ वाजताच लसीकरण केंद्रावर आले होते. नोंदणी आणि वेळ याची प्रत दाखवूनही त्यांना लसीकरणासाठी सोडले नाही. ‘वृद्धांना बसायला जागा नाही. तासन्तास उभे राहून त्यांना त्रास होत आहे. एकीकडे सामान्य माणसांना लस नाही, असे सांगतात आणि पालिका अधिकाऱ्यांच्या राजकीय पक्षाच्या जवळचे थेट आत जाऊन लसीकरण कसे घेत होते,’ असा सवाल गॉडविन यांनी केला.

कोहिनूर येथील लसीकरण केंद्रावर दिवसाला दोन ते अडीच हजार लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. बऱ्याचदा माणुसकीच्या नात्याने वृद्धांना, तंत्रज्ञान माहिती नसलेल्या लोकांना पूर्वनोंदणी नसतानाही त्यांची नोंदणी करून घेतो आणि त्यांना लस देतो. परंतु केवळ २५० लोकांना पुरेल इतकाच लससाठा, तेही दुपारनंतर प्राप्त झाल्याने आमचाही नाइलाज झाला. 

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर

वाहतूक कोंडी

कोहिनूर केंद्रावर वाहनातून लसीकरण होत असल्याने केंद्राबाहेर गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एकीकडे लोकांची गर्दी आणि दुसरीकडे वाहनांच्या रांगा यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 2:39 am

Web Title: most of the vaccination centers in mumbai remained closed due to shortage of vaccines zws 70
Next Stories
1 केंद्रांवरील लशीचा साठा निर्धारित करण्याचे पालिकेचे आदेश
2 प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करू नये!
3 रेल्वेमार्गातील पूरस्थितीवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष
Just Now!
X