९७८ मंडळांचा निर्णय; नियमांची चौकट, आर्थिक टंचाईचा फटका

मुंबई : दरवर्षी दहा दिवस धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा करोनाच्या धास्तीमुळे आपला उत्सव थोडक्यात आटोपला. आर्थिक टंचाई, नियमांची चौकट, करोनाचा धोका यामुळे मुंबईतील तब्बल ९७८ मंडळांनी दीड दिवसातच गणेशमूर्तीचे विसर्जन केले. दरवर्षी दीड दिवशी जेमतेम २०० मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होते.

करोनाच्या संसर्गाच्या भीतीचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर आहे. विसर्जनावर सरकारी यंत्रणांनी बंधने घातल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा नक्की कसा असेल, कसा पार पडेल याबद्दल प्रसार माध्यमे, भक्त मंडळी, पालिका यंत्रणा या सर्वानाच उत्सुकता होती. सार्वजनिक मंडळे नक्की कशा पद्धतीने उत्सव साजरा करतील याविषयीही उत्सुकता होती. अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला. तर अनेकांनी प्रथेत खंड पडू नये म्हणून गणेशमूर्ती आणली आणि तिचे दीड दिवसात विसर्जन केले. मुंबईतील एकू ण सुमारे ११ हजार सार्वजनिक मंडळांपैकी के वळ दीडशे-दोनशे मंडळे दीड दिवसाकरिता गणपती आणतात. बहुतांशी सार्वजनिक मंडळे अकरा दिवस गणेशोत्सव करतात. यंदा मात्र दहा दिवसांचा गणपती आणणाऱ्या मंडळांनीही दीड दिवसातच विसर्जन केले आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील मिठानगरचा राजा या सार्वजनिक मंडळाचे यंदाचे २१ वे वर्ष होते. हे वर्ष खास पद्धतीने साजरा करण्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मानस होता. पण मे-जून महिन्यापर्यंत मुंबईत करोनाचा कहर राहल्याने गणेशोत्सवाबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना, त्यांच्या घरातल्यांना आणि रहिवाशांना संसर्गाचा धोका नको म्हणून सरकारने नियमावली जाहीर करण्याआधीच आम्ही दीड दिवसाचा गणेशोत्सव करण्याचे ठरवले, अशी माहिती अध्यक्ष ऋषीकेश पालकर यांनी दिली. दरवर्षी मंडळाची २३ फुटांची मूर्ती मंडपातच तयार केली जाते. यंदा केवळ दोन फुटांची पूजेची मूर्ती आणण्यात आली. रविवारी मंडपाच्या आवारातच सजवलेल्या पिंपात या शाडूच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ६९वे वर्ष असून त्यांनी दीड दिवसातच गणपतीचे विसर्जन केले. यंदाच्या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र उत्सव साजरा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्त्यांची गरज असते. त्यातच आमचा एक कार्यकर्ता करोनामुळे आमच्यातून गेला. अनेक कार्यकर्त्यांच्या घरातूनही विरोध होऊ लागला. त्यामुळे गणेशोत्सवामुळे कुणा कार्यकर्त्यांला संसर्ग होऊ नये म्हणून दीडच दिवसाचा उत्सव केला, अशी प्रतिक्रिया मंडळाचे विजय इंदुलकर यांनी दिली.

मंडळे आर्थिक अडचणीत

करोनाच्या धास्तीबरोबरच मंडळांचे यंदा आर्थिक गणितही कोलमडले होते. मोठमोठय़ा वर्गणीदारांचा, जाहिरातदारांचा गेल्या वर्षीचा निधी अद्याप आलेला नाही. मार्चपासून टाळेबंदी झाल्यामुळे अनेकांना व्यवसायात तोटा झाल्यामुळे आता हे अडकलेले पैसे मिळण्याचीही शाश्वती नाही.