‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचं हिंदुत्व नाही. आज महिलांवर अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत. महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही? मी विधानसभेत म्हटलं होतं की इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सभेला परवानगी नसल्याने मुंबईच्या सावरकर स्मारक भवनात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला हिंदुत्वाबद्दल कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यानंतर देशात जो हल्लकल्लोळ उसळला. तेव्हा कोणाची हिंमत नव्हती सांगायची. आता जे आम्हाला हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत, ते त्यावेळी शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते, काही कल्पना नाही. कदाचित त्या वेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हतं ते आम्हाला विचारताहेत तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?

“शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्याच सांगितली.

हिंदुत्व कसं हवं जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. सकाळी रा. स्व. संघाचा मेळावा झाला यामध्ये सरसंघचालकांनी भाषण केलं. त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर डोक असेल तर त्या डोक्यानं तुमच्या सरसंघचालकांच्या वाक्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्यावं, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.