अल्पवयीन मुलीला तिच्याच आईने देहविक्री व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर तिच्यावर भावाकडून आणि पतीकडून बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पीडित मुलीची आई, भाऊ, पती आणि इतर दोघांना अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आईने जबरदस्तीने इच्छेविराधात एप्रिल २०१८ मध्ये तिचं लग्न लावून दिलं. मुलीला पतीकडून वारंवार मारहाण करण्यात आली. तसंच बलात्कारही करण्यात आला. यानंतर मुलगी पुन्हा आपल्या मानखुर्द येथील घरी आली.

“काही महिन्यांनी मुलीच्या आईने तिला एका दलालाकडे नेलं आणि जबरदस्ती देहविक्री व्यवसायात ढकललं”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. मुलीने शनिवारी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्कार दाखल केली. आईने आपल्यावर जबरदस्ती करत ६० वर्षांच्या व्यक्तीसोबत शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.

जेव्हा आपण भावाकडे मदत मागण्यासाठी गेलो तेव्हा त्यानेही आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा मुलीचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत एकूण पाच जणांना अटक केली आहे.