मुंबईतल्या दहिसर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱया नराधम पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलीच्या सावत्र आईला यासंपूर्ण प्रकराची माहिती असूनही आपल्या पतीला अटक झाल्यावर घर कसे चालणार? या भितीने तिने याची कोणाकडेही वाच्यता केली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लंबरचे काम करणाऱया हा नराधमाला दोन पत्नी आहेत. गेली दोन वर्षे तो आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलीवर बलात्कार करत होता. पहिली पत्नी गावी वास्तव्याला असून तिची १४ वर्षांची मुलगी मुंबईत दहिसर येथे त्याच्या दुसऱया पत्नीसोबत राहत होती. दुसरी पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपी आपल्या अल्पवयीन मुलीचे शोषण करत असे, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीने याप्रकाराची आरोपीच्या दुसऱया पत्नीजवळ तक्रार केली होती. पण, तिने पोलिसांना माहिती देणे टाळले. अखेर पीडितेने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीला कलम ३७६ अंतर्गत त्वरित ताब्यात घेऊन दिंडोशी सत्र न्यायालसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.