अँटॉप हिल येथील धक्कादायक  घटना

सावत्र आईने केलेल्या मारहाणीत दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल येथे घडली. शवविच्छेदन अहवालानंतर मुलीचा मृत्यू डोक्यावरील जखमेमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या सावत्र आईला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली.

अँटॉप हिलच्या बंगालीपूरा भागात राहणाऱ्या दीड वर्षांच्या मुलीला डोक्याला मार लागल्याने शुक्रवारी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला होता. अँटॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर डोक्याला झालेल्या जखमेमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे आणि तिच्या पाठीला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुलीची मृत्यू मारहाण झाल्यामुळे झाला असावा असा संशय पोलिसांना आला होता.

त्यानंतर पोलिसांनी सावत्र आईची अधिक चौकशी करण्यात सुरूवात केली. मुलगी खेळताना पडून मृत्युमुखी पडल्याचे तिची सावत्र आई रझिया अब्दुल रौफ शेख (२४) चौकशीदरम्यान वारंवार सांगत होती.   पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, मुलीला मारहाण करत असताना तिचे डोके भिंतीवर आणि मोरीच्या कट्टय़ावर आपटल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पतीच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या या मुलीचा रझिया शेख दुस्वास करत होती, तिला सतत मारहाणही करत होती, असे तपासात सिद्ध झाले. गुन्हा मान्य केल्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी शनिवारी रझियाला अटक केली आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.