मोबाइलवर व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्यामुळे आणि आईच्या रागावण्यामुळे नाराज झालेल्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. गत गुरूवारी ही घटना मुंबईत घडली. मोबाइलवर व्हिडिओ पाहत असताना आईने मुलीला रागावले आणि व्हिडिओ पाहू दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीने आत्महत्या केली. मुलीने गळफास घेतला होता. त्यानंतर रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली युवती मध्य मुंबईतील भोईवाडा येथे आपल्या पालकांबरोबर राहत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीला आईने दिवसभर मोबाइल वापरू दिला नव्हता. आईने मुलीला रागावलेही होते. त्यामुळे नाराज झालेल्या युवतीने घरातील बाथरूममध्ये स्वत:ला बंद करून घेतले होते.

खूप वेळा झाला तरी ती बाहेर न आल्याने बाथरूमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला त्वरीत सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयात तिच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. अखेर तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास सुरू केला.