वडिल आणि मुलीमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आईनेच पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. खारघरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेला बुधवारी अटक केली. मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या आईला अटक केली. मृत मुलगी १६ वर्षांची होती. खारघर येथील फ्लॅटमध्ये चार मार्च रोजी हा गुन्हा घडला. आरोपी महिला गृहिणी असून तिचा नवरा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. आरोपी महिलेला एकूण चार मुले आहेत. त्यातील पीडित मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा खारघरमध्ये त्यांच्यासोबत राहतात. अन्य दोन मुले राजस्थानमधल्या गावच्या घरी राहतात.

चार मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी महिलेने ओढणीने गळा आवळून मुलीची हत्या केली. दुपारी पावणेदोनच्या सुमारास तिचा नवरा घरी आला. त्यावेळी त्याने मुलीला बेडरुममध्ये पाहिले. मुलगी गाढ झोपेत असल्याचे या महिलेने तिच्या नवऱ्याला सांगितले. त्यानंतर चारच्या सुमारास या महिलेने नवऱ्याला फोन केला व मुलगी निपचित पडली असून काहीही हालचाल करत नसल्याचे सांगितले. जेव्हा नवरा घरी परतला तेव्हा मुलीचा मृत्यू झालेला होता. संध्याकाळी सातच्या सुमारास नातेवाईक घरी जमल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

मुलीच्या मानेजवळ गळा आवळल्याच्या खूणा होत्या. त्यामुळे आमचा संशय बळावला असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप काळे यांनी सांगितले. मुलीचे आई-वडिल तिचा मृतदेह राजस्थानला घेऊन गेले तिथे त्यांनी अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

पोलिसांनी पीडित मुलीच्या शाळेमध्ये चौकशी केली त्यावेळी असे समजले कि, पीडित मुलीचे वडिलांबरोबर सेक्स संबंध असल्याचा तिच्या आईला संशय होता. म्हणून मागच्या सहा महिन्यांपासून या मुलीची आई तिला मारहाण करत होती. एकतर वडिलांना किंवा तुला संपवून टाकीन अशी धमकीच या मुलीला तिच्या आईने दिली होती असे पीडित मुलीच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. पीडित मुलीने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता असे पोलिसांना समजले. जेव्हा या मुलीचे पालक राजस्थानवरुन परतले तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच मुलीच्या आईने गुन्हयाची कबुली दिली. आरोपी महिलेविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.