सीमा भोईर: पनवेल-
लहान मुलं हे देवाचं रूप असतात. त्यांचे बोबडे बोल, त्यांचं घरात वावरणं, त्यांची मस्ती खट्याळपणा सर्वाना हवाहवासा वाटतो. मस्तीचा अतिरेक झाला तर आई एखादा धपाटा घालते. मात्र मुलीची मस्ती डोईजड झाल्याने एका क्रूर मातेने निर्घृणपणे चक्क मेणबत्तीचे चटके सर्वांगावर दिल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे.
या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्या क्रूर मातेला व तिला साथ देणाऱ्या मुलीच्या काकूला पोलिसांनी अटक केली आहे. घनश्याम नंदजी यादव (वय २३) हे कळंबोलीतील रोडपाली येथील सेक्टर १४ मध्ये आपल्या पत्नी व मुलीसह राहतात. घनश्याम यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. ते घरी नसताना त्यांची ५ वर्षांची मुलगी साक्षी ही मस्ती करते म्हणून पीडित मुलीची आई अनिता व काकू रिंकी यादव या दोघींनी मिळून तिच्या सर्वांगावर मेणबत्तीने चटके दिले. घनश्याम जेव्हा कामावरून घरी परतले तेव्हा साक्षीची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. चटके कोणी दिले, याचची साक्षीकडे विचारणा केली असता मुलीने आईचे व काकूचे नाव सांगितले.
हे ऐकताच घनश्याम यांचा संताप अनावर झाला व त्यांनी साक्षीला घेऊन थेट कळंबोली पोलीस स्टेशन गाठले. त्यानी सर्व कहाणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सांगितली व पत्नी अनिता व भावजय रिंकी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कलम ७५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पीडित मुलीच्या आई व काकूला अटक करण्यात आली आहे. सबंधित घटनेसंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 12:35 am