भारतीय रेल्वेच्या इतिहासातील अनोख्या अशा चर्चगेट अपघात प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आला असून या अहवालानुसार मोटरमनला घरी जाण्याची घाई असल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या मोटरमनची कामाची वेळ संपत आली होती, त्यामुळे तो बाजूच्या फलाटावर उभी असलेली विरार गाडी पकडण्याच्या तयारीने मोटरमन केबिनमध्ये सामानाची आवराआवर करीत होता. त्याच वेळी त्याचे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मोटरमन तिवारी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला रविवारी झालेल्या या अपघातात चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक तीनवर गाडी रूळ सोडून फलाटावर चढली. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या विचित्र अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चार अधिकाऱ्यांची समिती नेमली. हा अहवाल बुधवारी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर करण्यात आला.
दरम्यान, सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात अपघातानंतर मोटरमन केबिनमध्ये शिरून एका कर्मचाऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले होते.
मात्र मोटरमन तिवारी यांनी आपण ब्रेक लावण्याचा प्रयत्न करूनही ब्रेक लागले नाहीत. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
अपघाताचे कारण..
अहवालातील कलम ९.१४ नुसार या मोटरमनच्या कामाची वेळ चर्चगेट येथे संपत होती. त्यामुळे बाजूच्याच फलाटावर उभी असलेली विरार गाडी पकडण्यासाठी तो आपल्या सामानाची आवराआवर करीत असावा. गाडी चालवताना मोटरमनला एका हॅण्डलवर कायम हात ठेवावा लागतो. हॅण्डलवरील हात निघाल्यानंतर गाडी आपोआप थांबते. मात्र दोन स्थानकांमध्ये हात मोकळे राहावेत, यासाठी अनेकदा मोटरमन त्या हॅण्डलला लाकडी आडोसा लावून ते दाबून ठेवतात. परिणामी मोटरमनने हात न ठेवताही गाडी पुढेच चालू राहते. या प्रकरणात सामानाची आवराआवर करताना गाडी थांबवण्याचे मोटरमनच्या लक्षात आले नसावे आणि लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला असावा, असे या अहवालात म्हटले आहे.