लातूरमध्ये रेल्वे आणि मेट्रो ट्रेनसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती होईल अशी घोषणा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला आनंदाची बातमीच दिली आहे. या घोषणेमुळे ५०  हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. रेल्वे, राज्य सरकारचा एमआयडीसी विभाग यांच्यात ६०० कोटींचा करार झाला आहे. लातूरमधील कोच बांधणी प्रकल्पामुळे ५० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. लातूर सोबतच बीड आणि परभणी या शहरांमध्येही रेल्वे आणि मेट्रो कोच निर्मितीसाठी वेंडर्सची इको सिस्टिम उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र हा मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी देणारा उपक्रम ठरला आहे.

आज झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, तसेच सुभाष देसाई, रणजीत पाटील यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात देशातील विविध उर्जा कंपन्यांशी १ लाख ६० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.

रिलायन्स, व्हर्जिन हायपरलूप, गृहनिर्माण, ज्वेलरी इंडस्ट्री यांच्यासोबतही मोठे करार करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी सुमारे ७१ टक्के भूसंपादन झाले आहे. एक इंच जमीनही परवानगी शिवाय घेतली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.