18 January 2021

News Flash

माऊंट मेरी जत्रेच्या गर्दीला ओढ

माऊंट मेरी बेसलिका चर्च हे वांद्रय़ाच्या समुद्रसपाटीवर ८० मीटर उंच टेकडीवरील १०० वर्षांहून जुने चर्च आहे.

८ सप्टेंबर या माऊंट मेरीच्या जयंती दिनानंतरच्या रविवारी माऊंट मेरीची जत्रा सुरु होते

दिशा खातू

भाविकांमध्ये उत्साह, मात्र पर्यटकांची पाठ

सर्वधर्मीयांचे आकर्षण असलेल्या वांद्रय़ातील प्रसिद्ध माऊंट मेरी जत्रेचा उत्साह यंदा ओसरला आहे. भाविकांनी आणि हौशी मंडळींनी पाठ फिरविल्याने एरवी विक्रमी गर्दी असलेल्या या जत्रेत शुकशुकाट जाणवत आहे.

माऊंट मेरी बेसलिका चर्च हे वांद्रय़ाच्या समुद्रसपाटीवर ८० मीटर उंच टेकडीवरील १०० वर्षांहून जुने चर्च आहे. माऊंट मेरीच्या जयंतीनिमित्त येथे १६६९ पूर्वीपासून जत्रा भरत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ८ सप्टेंबर या जयंती दिनानंतरच्या रविवारी जत्रा सुरू होते ती पुढच्या रविवापर्यंत म्हणजे ८ दिवस सुरू असते. वर्षांनुवर्षे या जत्रेत सर्व समाजांचे लोक सामील होत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या जत्रेतील गर्दी ओसरत असल्याचे दिसून येत आहे. यंदाही या जत्रेत फारशी गर्दी नाही. त्यामुळे जत्रेत पूर्वीच्या तुलनेत शुकशुकाट दिसत आहे. तेथे मेणबत्ती आणि फुलांची दुकाने लावणारे के नॅल डायस यांनी सांगितले की, पूर्वी जत्रेला प्रचंड गर्दी होत असे; पण आता गेल्या दोन-तीन वर्षांत हळूहळू गर्दी ओसरू लागली आहे. जत्रेला महाविद्यालयीन मुलांपासून अगदी कुटुंब, वृद्ध मंडळी येत असत. मात्र या वर्षी पहिल्या चार दिवसांत फार गर्दी झालेली नाही. फेरीवाल्यांना दुकाने दिली आहेत. इतर फेरीवाल्यांना मनाई केली आहे. त्यामुळे जत्रेला येणाऱ्यांना सहज वाट काढता येते. आता डिजिटल युगात कदाचित लोकांना जत्रेसारख्या पारंपरिक मनोरंजनाची ठिकाणे कालबाह्य़ वाटत असावी, अशी शक्यता डायस यांनी वर्तवली.

ही जत्रा साधारण चर्चच्या आजूबाजूच्या २ कि.मी. परिसरात भरते. चणेफुटाणे हा इथला मुख्य प्रसाद. काळाच्या ओघात नवनवीन पदार्थ म्हणजे केक, चॉकलेट, मॅझिपॅन आले असले तरी चणे फुटाणे मात्र लोक आवर्जून खरेदी करतात. तसेच या जत्रेत अनेक कोकणी पदार्थ वर्षांनुवर्षे मिळत आहेत. यात कोकम सरबत, मालवणी खाजा, फेण्या असतात. तसेच पेठा, सुतारफेणी, मावा बर्फी मिळते. आता जुजुब, घरगुती चॉकलेट्स, बिस्किटे, मावा केक, प्लम केक इत्यादी भरपूर प्रमाणात विकण्यासाठी येतात. येथे सर्वाधिक दुकाने खाऊ ची असतात. त्याखालोखाल कपडय़ांची. पारंपरिक खाद्यपदार्थात गेल्या काही वर्षांत चाट, भेळपुरी, वडा-पाव, भजी, मिनी पिझ्झा, सँडविच, चायनीज इत्यादींची भर पडली आहे. सप्टेंबर गार्डनमध्ये वेगवेगळे झोपाळे, आकाशपाळणे आहेत. येथे अगदी ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत कपडे उपलब्ध आहेत. गळाबंद हार, मणी आणि रंगीत दगडांच्या माळा, अंगठय़ा यांची दुकाने आहेत.मेणबत्ती आणि फुलांच्या दुकानांना सर्वाधिक महत्त्व आहे. कारण प्रार्थनेसाठी आणि नवस बोलण्यासाठी आलेले भाविक नेहमी मेणबत्ती आणि फुले विकत घेतात. आपली जी इच्छा आहे त्या इच्छेच्या मेणबत्ती तेथे उपलब्ध असतात.

‘‘मी दरवर्षी माऊं ट मेरीच्या जत्रेला येते; पण आता नेहमीसारखी गर्दी नसते. व्यवस्थित फिरता येते. माझ्या ओळखीतल्या अनेक लोकांना तर माहितीच नाही की जत्रा आहे. समाजमाध्यमांवर छायाचित्रे पाहिल्यावर सर्व जण विचारू लागले की, कधीपर्यंत जत्रा आहे. पूर्वी असे नव्हते. त्यामुळे बेत बनायचे. शेअर रिक्षा, बसने जत्रेत जाण्याकरिता रांगा लागायच्या. काही रस्ते बंद असल्याने चालत जावे लागत असे; पण आता मात्र तसे नाही,’’ असे असे निकिती तिवारी हिने सांगितले.

दर वर्षी जत्रेचे संपूर्ण ८ दिवस रस्ते बंद केलेले असतात. यंदा हे रस्ते खुले आहेत. त्यामुळे माऊंट मेरीला जाणारी बस सुरू आहे. रिक्षांची, खासगी वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र गर्दी नसल्याने माऊंट मेरी जत्रेत पूर्वीसारखी चमक दिसत नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 4:08 am

Web Title: mount mary pilgrimage excitement among the devotees
Next Stories
1 शुभकार्याच्या ‘श्रीगणेशा’चा आनंद ‘लोकसत्ता’सोबत
2 ‘हतबल’ पालिका न्यायाच्या खिंडीत!
3 बेस्टची वीज स्वस्त, महावितरणची पाच टक्के महागली
Just Now!
X