प्रकल्प पूर्ण करण्यात झोपडय़ा, पादचारी पूल यांच्यासह तांत्रिक अडथळे

मुंबई : वरळी तसेच शिवडी परिसरात असणारी दाटीवाटीची वस्ती, वाढलेली वाहन संख्या आणि होणारी वाहतूक कोंडी, परिणामी तासन्तास प्रवास यांतून चालकांची सुटका करण्यासाठी वरळी ते शिवडी उन्नत मार्गिका उभारली जाणार आहे. परंतु ही मार्गिका उभारताना त्यासमोर अडचणींचा डोंगरच उभा आहे. हा प्रकल्प साकारताना झोपडय़ा, उड्डाणपूल आणि अन्य तांत्रिक अडथळे असून त्यातूून मार्ग काढत मार्गिका दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान एमएमआरडीएसमोर (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)आहे.

या प्रकल्पाचा आढावा एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी गुरुवारी घेतला. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी विविध मुद्यांवर आणि करावयाच्या उपायांवर प्रकल्प सल्लागार, कं त्राटदार, एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा के ली. प्रकल्पाच्या या मार्गात अनंत अडचणी असून प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. कामगार नगर येथे ४०० ते ५०० झोपडय़ा असून त्या प्रकल्पाच्या मार्गात येत आहेत. याशिवाय एक मोठा टेक्सटाइल नालाही आहे. आचार्य दोंदे मार्ग येथील मोनो रेलवरून, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरूनही उन्नत मार्गिका नेताना मोठे तांत्रिक अडथळा आहे. कामगार नगर येथील झोपडय़ांचे स्थलांतर करणे तसेच टेक्सटाइल नाला तसाच ठेवून तेथे मोठे काम करावे लागणार आहे.

मार्ग कसा?

शिवडी येथून वरळीकडे थेट वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकल्प मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वांद्रे-वरळी सागरी सेतू तसेच प्रस्तावित कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. उन्नत मार्ग प्रकल्प शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन पूर्व मुक्त मार्ग ओलांडून त्यानंतर शिवडी येथे हार्बर रेल्वे मार्ग पार करणार आहे. पुढे आचार्य दोंदे मार्गावरील मोनोरेल वरून, डॉ. आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल, प्रभादेवी येथे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरून आणि सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून तसेच कामगार नगर-१ व कामगार नगर-२ तसेच डॉ.अ‍ॅनी बेझंट मार्ग पार करून वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गाला जोडला जाईल.

कामगार नगर येथील झोपडय़ा, तसेच पादचारी व उड्डाणपूल वरळी ते शिवडी उन्नत मार्गिके दरम्यान येत आहेत. शिवाय दाटीवाटीच्या वस्त्याही असून यांसह अन्य तांत्रिक मुद्देही आहेत. त्यातूनच ही मार्गिका दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. मार्गिका कोस्टल रोडलाही जोडली जाणार आहे.

– एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए