नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर आता शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांपुढे आव्हानांचा डोंगर आहे. वेळापत्रके तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत अनेक बाबी कशा अंमलात आणायच्या याबाबत शाळा पेचात आहेत. वाढणाऱ्या खर्चाचा ताळमेळ राखण्याचे आव्हानही खासगी शाळांसमोर आहे.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासाठीही नियमावली शासनाने जाहीर केली. त्यानुसार एका वर्गात साधारण पंधरा ते वीस विद्यार्थीच बसवता येणार आहेत. सध्या एका तुकडीतील विद्यार्थी संख्या ही ६० पेक्षा अधिक असते. त्यामुळे एका वर्गातील विद्यार्थ्यांचे चार-पाच गट करावे लागतील. प्रत्येक  वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक द्यावे लागतील.

गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शाळेत तर बाकीचे विषय ऑनलाइन शिकवण्यात यावेत असे शिक्षण विभागाने सांगितले आहे. त्यामुळे एका शिक्षकाला एकच पाठ पाच, सहा वेळा शिकवावा लागेल. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत किंवा पालक परवानगी देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना हे तीन विषय कसे शिकवायचे असाही प्रश्न आहे. त्यामुळे वेळापत्रक निश्चित करणे आव्हानात्मक असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. त्यातही हे सर्व मर्यादित मनुष्यबळात करावे लागणार आहे.

प्रतिबंधीत क्षेत्रातील शिक्षकांना शाळेत येण्यास परवानगी नाही. तसेच शिक्षक किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती आजारी असेल किंवा इमारतीत मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळल्यास अशा शिक्षकांनाही शाळेत बोलावणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे मनुष्यबळ किती प्रमाणात उपलब्ध असेल याचीही चिंता मुख्याध्यापकांना सतावत आहे.

खर्चाचे काय? : शाळेतील बैठक व्यवस्थेत बदल करण्याबरोबरच स्वच्छता, र्निजतुकीकरण याचा अतिरिक्त खर्च शाळांना उचलावा लागणार आहे. अनेक पालकांनी या सत्रातील पूर्ण शुल्क दिलेले नाही. आता शाळांचा खर्च अधिक वाढणार आहे. विनाअनुदानित शाळांना शासन काही मदत करत नाही. या शाळांनी खर्च कसा भागवायचा असा प्रश्नही संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षकांच्या चाचण्या शाळेजवळच व्हाव्यात!

शिक्षकांनी १७ ते २२ नोव्हेंबपर्यंत करोना चाचणी करून त्याचा अहवाल शाळेत द्यायचा आहे. शिक्षकाना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यासच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या जवळच चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.

बैठक व्यवस्था, वर्ग व्यवस्था यांमध्ये अनेक बदल करावे लागतील. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय प्राधान्याने शाळेत शिकवायचे असल्यामुळे या शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार आहे. एकच घटक त्यांना परत परत शिकवावे लागेल. शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा सर्व शिकवावे लागेल. पाचवी ते आठवीचे शिक्षक नववी-दहावीला शिकवत नाहीत. शिवाय विद्यार्थ्यांनी वस्तूंची अदलाबदल करू नये, एकत्र जमू नये अशा सूचना आहेत. मात्र, या सगळ्यावर मुख्याध्यापक किंवा शिक्षक पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

– प्रशांत रेडीज, मुख्याध्यापक संघटना