धवल कुलकर्णी

गणतंत्र दिवसाच्या संचालनामध्ये मुंबई पोलिसांमध्ये काही नवीन पाहुणे दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदा मुंबई पोलिसांच्या ताफ्यात घोडदल म्हणजेच माऊंटेड पोलीस युनिट सेवेत दाखल झाले आहे. हे तेरा घोडे आणि त्यांचे स्वार गर्दी ट्रॅफिकवर नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येतील.

मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला युनिफॉर्म घालणारे हे पोलीस मराठाकालीन शिरस्त्राण सुद्धा परिधान करणार आहेत. राज्य पोलीस दलाचा असा मानस आहे की असे माऊंटेड पोलीस सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये लवकरच कार्यरत करावेत. या घोडेस्वार पोलिसांचा वापर लहान गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी आणि कॅमेरे घेऊन जिथे बेकायदेशीर जमाव असतो तिथे उंचावरून गर्दीचे चित्रीकरण करण्यासाठी आणि समुद्र किनारे व चौपाट्यांवर जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येईल.

इतर राज्यांमध्ये सुद्धा जसे पश्चिम बंगाल, पंजाब वगैरे अशा घोडदलाचा समावेश स्थानिक पोलिसांमध्ये असतो. जुनेजाणते पोलीस अधिकारी असं सांगतात की घोड्यावर बसलेले दोन पोलीस गर्दीवर चाल करून गेले, तर त्याचा परिणाम त्यांच्या अंगावर पायी धावून जाणाऱ्या 20 पोलिसांच्या इतका असतो. कारण घोड्यावर बसलेले हे पोलीस पाहून जमावाच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यांच्यावर नैसर्गिक दडपण येते.

साधारणपणे शंभर वर्षापूर्वी याच पोलीस घोडेस्वारांचा वापर करून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सर पॅट्रिक यांनी मुंबईला वेठीला धरणाऱ्या पठाण यांच्या गुन्हेगारी टोळ्यांना पायबंद घातला होता. अर्थात त्यापूर्वी सुद्धा 1857 चे स्वातंत्र्य समर मोडून काढण्यासाठी याच पोलिसांनी मदत केली होती.

1 जून 1922 ला केली यांनी मुंबई शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. एक कठोर आणि सचोटीचे अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या सर पॅट्रिक केली यांना असे लक्षात आले की, मुंबई शहरामध्ये पठाणांची लोकसंख्या वाढत चालली होती. केली यांनी या पठणांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अशा “पठाण ब्रांच” चे गंठण सुद्धा केले.

आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून हे पठाण लोक मुंबईत आले. ते गोदीमध्ये मजुरी आणि इतर अंगमेहनतीची कामं करायला. युसुफजाई, आफ्रिदी, दुरानी अशा अनेक जमातींमध्ये विखुरले गेलेले पठाण यांनी पाहता-पाहता मुंबई शहरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं. अनेक श्रीमंत मंडळी या पठाणांना रखवालदार म्हणून ठेवून घेत. याचे कारण जुन्या काळातल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात येते की दरोडे घालणारे आणि लुटालूट करणारे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पठाण असल्यामुळे एक पठाण दुसऱ्या पठाणाने रखवाली केलेल्या घरावर कधी दरोडा घालणार नाही. कारण असा दरोडा घातला आणि रखवाली करणारा पठाण प्रतिकार करताना मारला गेला तर त्यांच्या मूळ गावी जमातीमध्ये आणि कुटुंबामध्ये दंगाधोपा होऊ शकतो.

हे पठाण लोकांना दहशत बसेल अशा पद्धतीने वागतात आणि यांचा संबंध वाढणाऱ्या या गुन्हेगारीशी सुद्धा होता. लुटालूट दरोडे आणि अनैसर्गिक अनाचार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही पठाण गुंतले असल्याचे लक्षात आले. माजी पोलीस अधिकारी अरविंद पटवर्धन यांनी त्यांच्या “मी मुंबईचा पोलीस” या पुस्तकामध्ये केली.  त्यांनी पठाणांची दहशत मोडून काढायला केलेल्या उपाययोजनांबाबत विस्तृत माहिती दिली आहे.

पटवर्धन असं लिहितात की, केली आणि वायव्य सरहद्द प्रांत आतून नेमणुकीवर मुंबईत आणलेल्या पोलीस इन्स्पेक्टर आणि हेडकॉन्स्टेबल मार्फत शक्य तेवढ्या पठाणांना निवडून त्यांच्या मुलुखात हद्दपार केले. या हद्दपारीमुळे काही प्रमाणात का होईना इथे शिल्लक राहिलेल्या पठाणांनी धसका घेतला आणि बरेच पठाण मुंबईतून स्वतःहून सुद्धा पसार झाले.

पॅट्रिक केली यांनी आपले साधारणपणे शंभर-सव्वाशे घोडेस्वार पोलीस रिसाला पठाणांना जरब बसवण्यासाठी वापरले. त्याकाळात पठाणांची वस्ती शिवडी, भोईवाडा, काळाचौकी या भागात असे. याचे कारण असे की या भागात राहून ही मंडळी गिरणी कामगारांना आणि इतर श्रमजीवी यांना अत्यंत चढ्या दराने कर्ज देत. याचमुळे कदाचित मराठीमध्ये “पठाणी व्याज” ही संज्ञा रूढ झाली असावी.

कमिशनर केली यांनी रात्रीच्या वेळी पठाणांची वस्ती असलेल्या विभागांमध्ये घोडेस्वार पोलिसांना नियमित गस्त घालायला लावले. पटवर्धन म्हणतात की, ही गस्तीची उपाययोजनाही यशस्वी ठरली आणि पठाण यांचा उपद्रव बऱ्याच प्रमाणामध्ये आटोक्यात आला. मात्र त्यांची खंत अशी होती ती या मोहिमेत जनतेने जरुरी तेवढा प्रतिसाद पोलिसांना दिला नाही. कारण अनेक घरमालक आणि व्यापारी पठाणांना पहारेकरी म्हणून नोकरीवर ठेवत किंवा त्यांच्याविरुद्ध पोलीस तपासात सहकार्य करत नसत. पटवर्धन लिहितात की तरीसुद्धा केली आणि आपल्या संपूर्ण कार्यकाळात पठाणांना मात्र डोकंवर काढू दिले नाही हे खरे.

मुंबई पोलिसांच्या घोडदळाचे एवढी मोठी कामगिरी केली होती, तरीसुद्धा जसाजसा मुंबई शहर आणि बेटाचा विकास होत होता. तसेतसे हे पोलीस उपद्रवी जमावाला काबूत करण्यात निष्प्रभ ठरत होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये मोटारगाड्या येऊ लागल्या आणि हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. पटवर्धन यांनी लिहिल्याप्रमाणे केली यांनी हे लक्षात घेतले की घोड्यांऐवजी मोटारी झटपट ये-जा करण्यासाठी पोलिसांना उपयुक्त पडतील आणि त्यांनी घोडेस्वार पोलिसांची संख्या 104 वरून 45 वर आणली. 1924 मध्ये पहिल्यांदा मुंबई पोलीस दलाच्या मोटार वाहन विभागाची स्थापना केली.

त्यानंतर 1929 आणि नंतरच्या दंग्यामध्ये असे लक्षात आले की हे घोडेस्वार पोलीस दंगेखोरांना सामना करायला असमर्थ ठरत होते. कारण दंगलखोर पोलिसांवर तुफान दगडफेक करत आणि अरुंद गल्ल्यांमध्ये जिथे घोडा पटकन वळवता येणार नाही अशा ठिकाणी घोड्यांच्या तोंडावर दगड मारून त्यांना ते बेफाम करत. हळूहळू घोडेस्वार पोलिसांचा उपयोग सभा-समारंभ आणि इतर ठिकाणी जमावाला नियंत्रित करण्यासाठी होऊ लागला.

1932 मध्ये कमिशनर केली यांनी राज्य सरकारला असे सांगितले की, घोडेस्वार पोलीस दल बंद करून टाकावे. त्यावेळेला या दलांमध्ये 45 घोडे आणि 36 वार होते. राज्य सरकारने सुद्धा केली यांचे म्हणणे मान्य करून डिसेंबर 1932 ला घोडेस्वार विभाग पूर्णपणे बंद केला. मुंबई पोलिसांनी हा विभाग पुन्हा एकदा नव्याने सुरू केल्यामुळे एका अर्थाने घड्याळाची चाक पुन्हा एकदा उलटी फिरली आहेत…