विशेष गाडय़ांना प्रचंड गर्दीने नाराजी; विद्याविहार स्थानकाजवळील घटना

रेल्वे कर्मचारी विशेष गाडय़ांमध्ये असलेली प्रचंड गर्दी आणि सामाजिक अंतराचा उडत असलेला फज्जा यामुळे कर्मचाऱ्यांकडूनच रेल रोको करण्यात आल्याची घटना मध्य रेल्वेवर घडली. विद्याविहार स्थानकात घडलेल्या या घटनेत अर्धा तास रेल रोको करण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीही प्रवास केल्यामुळे या गाडय़ांना गर्दी होत आहे.

मध्य रेल्वेकडून कर्मचाऱ्यांसाठी सीएसएमटी ते कर्जत, कसारा दरम्यान विशेष मेल सेवा चालवल्या जातात. या गाडय़ा काही मोजक्या स्थानकात थांबविल्या जातात. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या श्रमिक रेल्वे गाडय़ा, त्यानंतर १ जूनपासून सुरू होणाऱ्या लांब पल्ल्याच्या विशेष गाडय़ांमुळे कामाचा ताण वाढला आणि रेल्वे कारखान्यांमध्ये ३३ टक्के  कर्मचाऱ्यांची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे. सुरुवातीला विशेष लोकल चालवताना कमी फे ऱ्यांमुळे त्यातही सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजत होते. त्यामुळे लोकल फे ऱ्या बंद करून त्याऐवजी मेल गाडय़ा देण्यात आल्या. परंतु त्यांचीही संख्या कमी असल्याने प्रवासात गर्दी होऊन कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता विद्याविहार स्थानकात कर्मचाऱ्यांनी रेल रोको के ला. सीएसएमटीहून उशिराने आलेली गाडी, त्यात प्रचंड गर्दी असल्याने विद्याविहार स्थानकात गाडी पकडण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि रुळावरच धाव घेत रेल रोको केला. त्यानंतर अधिकारी आणि पोलिसांच्या वतीने कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर पाऊण तासाच्या रेल रोकोनंतर गाडी कर्जतला रवाना करण्यात आली. या गाडीत रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही प्रवास करू लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना गर्दीचा सामना करावा लागत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेने याबाबत स्पष्ट केले की सायंकाळी साडे चार ते पाच वाजेपर्यंत तीन गाडय़ा कर्जत, कसारासाठी सोडण्यात येतात. मात्र तरीही या गाडय़ांना होणारी गर्दी पाहता आणखी एक फेरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

* करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रवासादरम्यान सामाजिक अंतरही पाळणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. परिणामी गाडय़ांना गर्दी होते.

* मध्य रेल्वेकडून सकाळी तीन आणि सायंकाळी तीन मेल गाडय़ा चालवल्या जातात.