मुंबई : तौक्ते चक्रीवादळात बळी पडलेल्या मृतांच्या नातलगांना तात्काळ १० लाख रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी फॉरवर्ड सी-मेन्स युनियन ऑफ इंडिया (एफसीयूआय) आणि सीटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि दुर्घटनेतून सुखरूप बचावलेले कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हाय येथे ‘पी ३०५‘ तराफा आणि ‘वरप्रदा’ ही टग बोट बुडून ८६ जणांचा मृत्यू झाला. तर दोन्हीवरील मिळून १८८ जणांना वाचविण्यात यश आले होते. वादळाची सूचना मिळूनही वेळीच तराफा बाहेर काढण्यात न आल्याने ही दुर्घटना घडली. पेट्रोलियम मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र दुर्घटनेला दोन महिने झाल्यानंतरही अद्यापही मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याने संघटनेने मुख्य कंत्राटदार असलेल्या अफकॉन कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी दुर्घटनेतून मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ३० हजार रुपये अथवा १ कोटी रुपयांची मदत द्यावी. तसेच त्यातील १० लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी, तसेच दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तींना मानसिक धक्क्य़ातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत द्यावी, अशी मागणीही ‘एफएसयूआय’चे जनरल सेक्रेटरी मनोज यादव यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन ‘एफएसयूआय’च्या वतीने अफकॉन कंपनीला दिले आहे.