मुंबई आणि परिसरातील शाळा सोमवारपासून (१८ जानेवारी) सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांकडे पाठवला असून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे.

मुंबई, ठाणे वगळता राज्यातील इतर भागांतील बहुतांशी शाळांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढते आहे. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याच्या धास्तीने मुंबई आणि ठाण्यातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, आता शाळा सुरू करण्याच्या हालचाली पालिकेच्या शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. विभागाने १८ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यानुसार मुंबईतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊ शकतील. यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पालकांचे संमतिपत्र आणि शिक्षकांना करोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल देणे आवश्यक आहे.

जबाबदारी संस्थांवरच

खासगी शाळांच्या इमारती र्निजतुक करण यासाठी पालिकेने मदत करावी, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली होती. मात्र, पालिकेने त्यांच्याच शाळांमध्ये तयारी सुरू केली आहे. अलगीकरण कक्षासाठी घेण्यात आलेल्या खासगी शाळा वगळता इतर सर्व संस्थांनीच त्यांच्या शाळा सुरू करण्याची तयारी करायची आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून शाळा सुरू करायच्या झाल्यास तशी सूचना देण्यात आलेली नाही, त्यामुळे खासगी शाळा गोंधळात आहेत. ‘‘यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्यासाठी तयारी केली होती. मात्र शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. चार दिवसांनी शाळा सुरू करायच्या असल्यास संस्थांना त्याची वेळेवर लेखी सूचना देणे आवश्यक आहे. शिक्षकांना चाचणी करण्यासाठीही वेळ मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या चाचण्यांचे अहवाल आता स्वीकारता येणार नाहीत,’’ असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.

शाळांची तयारी सुरू

पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांची स्वच्छता, र्निजतुकीकरण सुरू केले आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या अखत्यारीतील शाळांना तापमानमापक, प्राणवायूमापक, साबण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अलगीकरण कक्षासाठी घेण्यात आलेल्या शाळांचेही र्निजतुकीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.