रवी जाधव चित्रपट दिग्दर्शक

आता ठाण्यात राहात असलो तरी बालपण व शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर-गोपाळनगर शाखेचा मी विद्यार्थी. वाचनाची खरी सुरुवात शाळेतूनच झाली. वाचनाची गोडी तिथे लागली. आमच्या शाळेचे ग्रंथालय व डोंबिवलीत असलेल्या एक/दोन ग्रंथालयांतून सुरुवातीला पुस्तकांचे वाचन झाले. दहावी-बारावीपर्यंत व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांची सर्व पुस्तकं वाचून काढली होती. शाळेत असताना आम्हा मित्रांचा एक उद्योग असायचा. वपुंच्या पुस्तकातील काही चांगल्या ओळी आम्ही वहीत लिहून ठेवायचो आणि त्या वह्य़ा एकमेकांकडे फिरवायचो. ती वाक्ये एकमेकांना सांगायचो. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान झाले होते. ते व्याख्यान ऐकून नंतर ‘राजा शिवछत्रपती’ वाचून काढलेच. पण त्यामुळे ऐतिहासिक पुस्तके वाचायचीही आवड निर्माण झाली. तेव्हा अनेक ऐतिहासिक पुस्तके वाचली.

जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर वाचनाची आवड थोडी बदलली. अभ्यास म्हणून आणि अवांतर वाचन म्हणूनही चित्रकला, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात या विषयांवरील पुस्तकांचे अधिक वाचन झाले. यात ‘वन शो’, ‘डी अ‍ॅण्ड एडी’ आणि अन्य पुस्तकांचा समावेश होता. छायाचित्रण कलेवरील पुस्तकेही वाचून काढली. त्या वेळी काही संदर्भ हवे असतील, माहिती जमा करायची असेल तर ‘गुगल’ किंवा इंटरनेट मदतीला नव्हते. त्यामुळे ज्या विषयाची माहिती हवी असेल त्या विषयांवरील जास्तीतजास्त पुस्तके वाचणे, त्यातील महत्त्वाच्या भागाची टिपणे काढणे याद्वारे अभ्यास केला व माहिती मिळविली. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्यजाहिराती असलेल्या ‘ब्लॅक बुक’ या पुस्तकांचाही खूप उपयोग झाला. त्यामुळे त्या काळात आम्ही सर्वजण अक्षरश: पुस्तकांच्या गराडय़ातच असायचो.

याच काळात विजय तेंडुलकर, श्री. ना. पेंडसे, जी. ए. कुलकर्णी, चि.त्र्यं. खानोलकर, राम नगरकर आदी लेखकांचीही पुस्तके वाचली. जाहिरात क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर लोकसंगीताचा नाद लागला होता. डॉ. आनंद यादव यांची बरीच पुस्तके तेव्हा वाचली. पहिला चित्रपट करायचे ठरविले तेव्हा लोकसंगीतावर जे काही वाचले होते त्यावरच तो करू या असे डोक्यात आले. चित्रपटाच्या माध्यमातून ते वेगळ्या प्रकारे सादर करता येईल, असे वाटले आणि ‘नटरंग’ तयार झाला. त्यामुळे ‘नटरंग’ करताना आनंद यादव यांच्या आणि पुलंच्या पुस्तकांचा खूप मोठा फायदा झाला. पुलंच्या पुस्तकातून वाचलेल्या त्या त्या व्यक्तिरेखांचे आता वेगळ्या प्रकारे आकलन झाले होते. एखादी गोष्ट करायची की त्याचा पूर्णपणे अभ्यास व संशोधन करायचे ही माझी पहिल्यापासूनची सवय. त्या सगळ्याचा उपयोग आधी ‘नटरंग’ आणि पुढे ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ ‘टाइमपास’ हे चित्रपट करताना झाला. ‘बालगंधर्व’च्या वेळी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके वाचून काढली, अभ्यासली. बालगंधर्व ज्या ज्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणांना भेट दिली. पुस्तकातील संदर्भ उपयोगी पडले. लैंगिक शिक्षणावरील ‘बालक पालक’ करताना या विषयावरील पुस्तके वाचून काढली. त्यामुळे प्रत्येक चित्रपट करताना आधी वाचलेल्या पुस्तकांचा तसेच त्याच्याशी संबधित असलेल्या पुस्तकांच्या वाचनाचा चांगला उपयोग झाला. ‘टाइमपास’ करताना नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या तर ‘न्यूड’ करताना चित्रकार देऊसकर, सुहास बहुलकर यांच्या पुस्तकांचा फायदा झाला.

चित्रपट क्षेत्रात आल्यानंतर या क्षेत्रातील दिग्गजांची आत्मचरित्रे वाचली. यात भालजी पेंढारकर, प्रभाकर पेंढारकर, सुधीर फडके, लीला चिटणीस, दादा कोंडके आणि अन्य कलाकारांच्या आत्मचरित्रांचा समावेश होता. या पुस्तकातून त्या दिग्गज व्यक्तींचा संघर्ष, त्यांचा प्रवास समजून घेता आला. सध्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटासाठी शिवाजी महाराजांच्या  जीवनावरील पुस्तकांचे वाचन सुरू आहे. चित्रपटाची पटकथा कशी असावी हे समजून घ्यायचे असेल तर पुलंच्या पुस्तकात त्यांनी सादर केलेल्या अनेक व्यक्तिरेखा त्याचे उत्तम व आदर्श उदाहरण आहे. मानवी स्वभावातील अनेक बारकावे त्यांनी अचूक निरीक्षणातून त्या त्या व्यक्तिचित्रणात उत्तम प्रकारे मांडले आहेत. त्यामुळे आजही पुलंच्या पुस्तकांचे, त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखांचे वाचन अधूनमधून सुरू असते.

चित्रपट, जाहिरात, दिग्दर्शन आदी कलेचा कोणताही वारसा आमच्या घरात नाही. माझे वडील गिरणी कामगार होते. मी आज जो कोणी आहे त्याचे सर्व श्रेय हे पुस्तकांना आहे. बाहेरच्या जगात काय चालले आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांत या मोठय़ा मंडळींनी काय काम केले आहे, आपल्या कोषातून बाहेर पडून मोठी झेप घ्यायची म्हणजे काय करायचे, मोठे ध्येय म्हणजे काय, या सगळ्याची जाणीव मला पुस्तकांमुळेच झाली. बसल्या जागेवर बसून या पुस्तकांनीच मला बाहेरचे हे भव्य जग आणि माणसे दाखविली. इंटरनेटपेक्षा ही पुस्तके मला जास्त जवळची वाटतात. इंटरनेटवरून फक्त माहिती ‘डाउनलोड’ होते तर पुस्तकांमुळे ती माहिती व ज्ञान आपल्या जवळ कायम राहते, मनात घर करते.