गोवंडी पोलिसांकडून तिघांना अटक; मुख्य आरोपी फरार

चित्रपट चित्रिकरणासाठी हुबेहूब नोटाच दिसतील, अशा पद्धतीने छापून घेतलेले कागद चेंबूरमध्ये राहाणाऱ्या तरूणाच्या हाती लागले आणि त्याने हे कागद चक्क वठवलेही. नाशिकच्या एका सतर्क शेतकऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तूर्तास गोवंडी पोलिसांनी तीन तरूणांना अटक केली आहे. या बनावट नोटा अटक आरोपींना देणारा मुख्य आरोपी फरार आहे.

नाशिक, निफाडचे शेतकरी नाना सोनवणे दररोज आपल्या मळयात पिकलेली भाजी, फळे चेंबुरच्या डायमंड गार्डन परिसरात विक्रीस आणतात. सोमवारी रात्री हिशोब करताना दोन हजार रुपयांच्या दोन बनावट नोटा गल्ल्यात आल्याने ते व्यथित झाले. या नोटा कोणी दिल्या हे आठवताना सोमवारी सकाळी घाईच्या वेळेत दोन तरूणांनी दोन हजार रुपयांची नोट देऊन प्रत्येकी दोन किलो द्राक्षे विकत घेतल्याचे त्यांना आठवले. बुधवारी त्यांचे बंधू माल विक्रीला आणणार होते. सोनवणे यांनी भावाला घडला प्रकार सांगून सतर्क राहण्यास सांगितले. बुधवारी सकाळी पुन्हा एक तरुणाने दोन हजार रुपयांची नोट देत दोन किलो द्राक्षे विकत घेतली. ग्राहकांची गर्दी असल्याने सोनवणे यांच्या भावाने नोट स्वीकारली, सुटटेही दिले. तो तरूण द्राक्षे, सुटटे पैसे घेऊन मागे फिरणार इतक्यात भाऊ भानावर आला. त्याने या तरूणाला थांबवले. खिशात कोंबलेली नोट काढून न्याहाळू लागला. या नोटीवर आरबीआय ऐवजी भारतीय आझाद बँक आणि त्याखाली ‘धीस इज फॉर फन’ असे लिहिलेले आढळले. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली आणि खोटी नोट वठवू पाहाणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले.

आणखी नोटा वटविल्याचा संशय चेंबुरच्या घाटला परिसरात राहाणारा वासुदेव स्कूलबस चालक आहे. ही नोट घाटल्यात राहाणाऱ्या राजू व जीतू जाधव या भावंडांनी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी जाधव बंधूंच्या घरी धाड घातली. त्यांच्याकडून अशा बारा नोटा सापडल्या. त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांनी घाटला परिसरात राहाणारा, चित्रपट सृष्टीशी संबंधीत तरूणाने या नोटा दिल्याचे सांगितले. या नोटा चित्रपट चित्रिकरणासाठी खास बनवून घेण्यात आल्या होत्या. काम संपल्यावर त्या नष्ट करण्याऐवजी मिथूनने सोबत आणल्या आणि वठतात का पहा, असे सांगत जाधव बंधूंना दिल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, या प्रकरणाची बोंबाबोंब झाल्याने मिथून दोन दिवसांपासून घरी आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मिथूनने याआधी अन्य व्यक्तींच्या मदतीने अशा आणखी नोटा वठविल्या असाव्यात, असा संशय पोलिसांना आहे.