प्रपंच करावा नेटका 

३३ वर्षे वयाचे सचिन राजाध्यक्ष एका व्यापारी जहाजावर नोकरी करतात. त्यामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य सुटीपुरतेच असते. सध्या ते सुटीवर मायदेशी आले असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पुन्हा जहाजावर प्रयाण करणार आहेत. मुंबईतील अंधेरी भागात त्यांच्या पत्नी चित्रा मोंडकर-राजाध्यक्ष आणि दोन वर्षांचा मुलगा मंगेश राहतात. सचिन हे अनिवासी भारतीय असल्याने त्यांचे उत्पन्न करमुक्त आहे, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करणाऱ्या चित्रा यांचे वार्षिक उत्पन्न २० टक्के प्राप्तिकर कक्षेत येते.

राजाध्यक्ष दाम्पत्यापुढे नजीकच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न मंगेशच्या शालेय प्रवेशाचा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मंगेशच्या ‘प्रीस्कूल’ प्रवेशासाठी शिक्षणशुल्क आणि डोनेशन यासाठी दोन लाख रुपये खर्च येईल, असा सचिन यांचा कयास आहे. चित्रा यांचा मोठा खर्च मेट्रोचा प्रवास आणि रिक्षाभाडे यावर होतो. त्यापैकी मेट्रोचे भाडे महागण्याची त्यांना भीती आहे.

अर्थसंकल्पाचा परिणाम

राजाध्यक्ष कुटुंबीयांचा मासिक खर्च ५० हजारांच्या घरात जातो. अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्याप्रमाणे सेवा कर १५ टक्क्यांवर गेल्यास हा घरखर्च ५५ ते ६० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

चित्रा व सचिन यांचे हॉटेलमधील खाणे तसेच मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. सेवाकरात वाढ झाल्यामुळे त्यांना खानपान आणि मनोरंजनासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागतील.

वार्षिक उत्पन्न १७ लाख रुपये

दरमहा खर्च ५० हजार रुपये