दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी विचारपूर्वक मुंबई हे ठिकाण आत्महत्येसाठी निवडले, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.  मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांवर गंभीर आरोप असल्याने या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी सावध तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा तपास साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे करावा या हेतूने मोहन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आपल्या विश्वासू व्यक्तींना मोबाइलद्वारे पाठवली असावी, अशी शक्यता असून ती पडताळण्यासाठी पोलिसांनी मोहन यांचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. मोहन यांनी मृत्युपूर्वी गुजराती भाषेत सुमारे १४ पानी चिठ्ठी लिहिली आहे. खासदार असा शिक्का असलेल्या पत्रावर मोहन यांनी ही चिठ्ठी लिहिली असून सुसाइड नोट असे त्याचे शीर्षक आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र या चिठ्ठीतील आरोप, नावे आदी तपशील देण्यास नकार दिला.

सिल्वासापासून त्यांच्यासोबत असलेला वाहनचालक अशोक पटेल, खासगी अंगरक्षक नंदू यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी जुजबी चौकशी केली. अंत्यसंस्कार आटोपल्यावर जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत येऊ, असे डेलकर यांच्या कुटुंबाने पोलीस पथकाला सांगितले.