गर्दीच्या वेळी जादा फेऱ्यांसाठी खासदारांची सूचना
उपनगरीय रेल्वेमार्गावर गर्दीच्या वेळी फेऱ्या वाढवण्यासाठी आणि वक्तशीरपणा आणण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाडय़ांना मुंबईबाहेरच थांबवा, अशी सूचना मुंबईतील खासदारांनी केली आहे. एक लांबपल्ल्याची गाडी तीन उपनगरीय गाडय़ांचा वेळ घेते. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील गाडय़ांचे वेळापत्रक बदलून त्या दुपारच्या वेळेत मुंबईत आल्या तर उपनगरीय प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे या खासदारांनी म्हटले आहे.
वाढती प्रवासी संख्या आणि त्यामुळे सुरक्षित प्रवासात येणारे अडथळे टाळण्यासाठी मुंबईतील खासदारांनी मध्य रेल्वेला काही सूचना पाठवल्या आहेत. यात खासदार अरविंद सावंत आणि खासदार राजन विचारे यांनी विविध उपाय सुचवले असून, त्यात सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यापासून प्लॅटफॉर्मची उंची तातडीने वाढवण्यात यावी, इथपर्यंत अनेक उपायांचा समावेश आहे. गर्दीच्या वेळी मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावेत किंवा या गाडय़ा मुंबईबाहेरच थांबवण्यात याव्यात, अशी सूचना या दोन्ही खासदारांनी केली आहे.
या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मध्य रेल्वेला लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक बदलावे लागेल. कारण कल्याण किंवा पनवेल येथे गाडय़ा रद्द करण्यासाठीची तांत्रिक तयारी या दोन्ही स्थानकांमध्ये नाही. त्यामुळे या स्थानकांमध्ये गाडय़ा रद्द करून पुन्हा मागे वळवणे रेल्वेच्या दृष्टीने अडचणीचे आहे. यासाठी मुंबईच्या वेशीबाहेर स्वतंत्र टर्मिनसची व्यवस्था गरजेची आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात सॅटेलाइट टर्मिनसची घोषणा केली होती. मुंबईसाठी पनवेल, ठाकुर्ली आणि वसई या ठिकाणी ही टर्मिनस उभारण्याबाबत चाचपणीही सुरू झाली होती. मात्र त्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत.