खा. गोपाळ शेट्टींचा पालिका अधिकाऱ्यांवर आरोप
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्या ताज्या असतानाच, मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीचे पाढेही उजेडात येऊ लागले आहेत. नागरिकांना नव्या सुविधा देणे तर दूरच, पण असलेल्या सुविधांपासूनही लोकांना वंचित ठेवण्याचा नवाच पायंडा पालिकेतील अधिकाऱ्यांनी पाडला असून, राहत्या घरांचे वीज-पाणी बंद करून लोकांच्या मनात भय पेरण्याचे उद्योग सुरू झाल्याचा आरोप उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. विकासकांबरोबर साटेलोटे करून राहती घरे रिकामी करून देण्याचा सपाटा पालिकेतील अधिकाऱ्यांनी लावला असून तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खा. शेट्टी म्हणाले की, राज्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शासकीय स्तरावर त्या सोडविण्यासाठी जनतेला मदत करणे हे शासकीय अधिकाऱ्यांचे काम असते. पण अलीकडे लोकांना बेघर करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. अनियमित बांधकामांत राहणाऱ्यांच्या गरजा व अडचणी लक्षात घेऊन त्यांना दिलासा मिळावा, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना पर्यायी जागा देऊन अशा इमारतींचा पुनर्विकास करावा अशी सरकारकडून अपेक्षा असते. पण अद्यापही सरकारच्या माध्यमातून त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल किंवा परिणामकारक कायदा केला गेलेला नाही. दिनेश अफझुलपूरकर समितीचा अहवाल कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरात सरकारने काही हालचाली केल्या असल्या तरी त्याचे परिणाम अद्यापही लोकांसमोर आलेले दिसत नाहीत. अशा वेळी नेमकी दिवाळीची संधी साधून धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याचा व नागरिकांच्या मनात बेघर होण्याचे भय निर्माण करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू झाला असून याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले आहे.
धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचे वीज व पाणी बंद करण्याचा प्रकार तर गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अशा इमारतींमधील रहिवाशांना पर्यायी जागा मिळणार की नाही, त्यांना कोण जागा देणार याची कोणतीच व्यवस्था शासन किंवा प्रशासन करीत नसल्याची खंत व्यक्त करीत खा. शेट्टी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ही तर उद्रेकाची चिन्हे!
पश्चिम उपनगरातील मालाड येथे देवेंद्र जैन नावाच्या साहाय्यक आयुक्तांनी गेल्या दोन वर्षांत अनेक इमारतींमधील वीज व पाणी तोडून व नोटिसा बजावून अनेक घरे रिकामी करून घेतली असून रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची किंवा पुन्हा घर देण्याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही. या प्रश्नावर योग्य वेळी लक्ष दिले गेले नाही तर मुंबई व महाराष्ट्रात फार मोठा उद्रेक निर्माण होईल.
– खा. गोपाळ शेट्टी