दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून आता महाराष्ट्रात देखील राजकारण तापू लागले आहे. एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली असताना सत्ताधारी पक्षांकडून मोहन डेलकर प्रकरणात केंद्रातील भाजपा सरकारने काय केलं? असा जाब विचारला जात आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत आपल्याच सरकारकडे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, केंद्रातील मोदी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोलेंनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल खोडा पटेल आणि तिथल्या व्यवस्थेवर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये ज्यांची नोंद असेल, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत ही मागणी आम्ही केली आहे. एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातच्या भाजपा सरकारने केलं आहे. डेलकर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत ५६ इंच छातीचे पंतप्रधान आहेत. पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची जनता सुरक्षित कशी असेल?” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काय आहे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण?

दादरा नगर हवेलीचे ५८ वर्षीय खासदार मोहन संजीभाई डेलकर यांनी मुंबईच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी १४ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. ही नोट पोलिसांच्या हाती लागली असून यामध्ये अनेक राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी रात्री डेलकर यांनी आत्महत्या केली. सोबत आणलेल्या शालीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. त्यामुळे, आत्महत्या करण्याचं ठरवूनच ते मुंबईत आले आणि हॉटेलमध्ये थांबले, असा तर्क देखील लावला जात आहे.

१९८९मध्ये पहिल्यांदा डेलकर दादरा-नगर हवेलीमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. १९९१मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी जिंकले, तर १९९८मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. २००९मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९मध्ये पक्षीय मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली.

“सुशांतच्या हत्येची ‘पटकथा’ तयार करणाऱ्यांना डेलकरांच्या आत्महत्येत काहीच काळंबेरं दिसू नये?”