संजय राऊत यांचा भाजपला टोला

महाराष्ट्रात आता निवडणूक झाल्यास शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल, असे परखड मतप्रदर्शन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
बिहार निवडणुकीत आमच्या मित्रपक्षाला ज्या जागा मिळाल्या, ते काही चांगले झाले नाही, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजपने २५ वर्षांच्या मित्राची साथ सोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविली. केंद्रीय मंत्रिमंडळ, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रचंड पसा अशी ताकद भाजपने लावूनही शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. भाजपने त्याच पद्धतीने बिहारमध्येही प्रचंड ताकद पणाला लावली. पण बिहारमध्ये विजय मिळवून नितीशकुमार हे महानायक ठरले. सध्याच्या वातावरणात महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळेल,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

भाजप नेत्यांचे ‘नो कॉमेन्ट’
नागपूरसह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी नागपुरात असूनही काहीही बोलण्यास नकार दिला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी या दोन्ही नेत्यांना त्याच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला होता. मात्र ते काहीही बोलले नाहीत.

बिहारमधील निकालांचा महाराष्ट्रातील सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकार भक्कम आहे आणि ते पाच वष्रे टिकेल. बिहारच्या जनतेने विकासाला महत्त्व दिले नाही. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करू.
– रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष