02 March 2021

News Flash

युतीची वेळ निघून गेली!

शिवसेनेची गरज आहे की नाही हे आम्ही ठरवू. आता भाजपने ते ठरविण्याची वेळ निघून गेली

संजय राऊत

अमित शहा यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; भाजपचा महामेळावा विचार हरविलेला

भाजपच्या ३८ व्या स्थापनादिनी मुंबईत शक्तिप्रदर्शन करताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडगे, साप, विंचू, कुत्रे, वाळवी अशी जी प्राण्याची जंत्री मांडली यातून भाजपच्या ‘गाजरा’चा पारदर्शक प्रवास लोकांना उलगडल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षांनी केली, तर शिवसेनेबरोबर जायचे की नाही, हे भाजपने ठरविण्याची वेळ आता निघून गेल्याचे सांगत भाजपचे शक्तिप्रदर्शन हे ‘विचार हरवलेला मेळावा’ असल्याचा घणाघाती टोला शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईतील भाजपच्या शक्तिप्रदर्शन मेळाव्यात शिवसेनेला चुचकारण्याचे सर्व प्रयत्न पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच नेत्यांनी केले. त्याच वेळी देशभरातील भाजपविरोधी वातावरण आणि एकत्र येत असलेले विरोधी पक्ष लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना लांडगे, कुत्रे, साप, विंचू आदी प्राण्यांचा मुक्तपणे वापर केला. गेल्या साडेचार वर्षांत आणि निवडणूकपूर्व भाजपने दिलल्या आश्वासनांचे नेमके काय केले हे सांगण्याऐवजी अमित शहा यांनी गेल्या सहा दशकांत काँग्रेसने काय केले, अशी विचारणा करून मूळ मुद्दय़ालाच बगल दिली. वेगवेगळ्या पक्षांतील भ्रष्ट‘वाल्यां’ना भाजपमध्ये घेऊन मिळवलेल्या विजयाची मस्ती साजरी करताना कालच्या मेळाव्याच्या बॅनरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांची साधी चित्रेही जे लावत नाहीत ते जनतेला काय विचारणार, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ज्या शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे गुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याच ‘परत्पर गुरूं’वर टीका करून त्यांचे पांग फेडण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतात, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. धनगर समाजाच्या आरक्षणापासून कर्जमाफीपर्यंत हवी तेवढी ‘गाजरे’ लोकांना दाखवली. आता पक्षाच्या स्थापना दिनाच्या मेळाव्यात भाजपच्याच कार्यकर्त्यांपुढे सांगण्यासारखे काही नसल्यामुळेच विरोधकांना लांडगे, कुत्रे, साप, विंचू, वाळवी अशी प्राण्यांची नामावळी घ्यावी लागल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.  शिवसेनेची गरज आहे की नाही हे आम्ही ठरवू. आता भाजपने ते ठरविण्याची वेळ निघून गेल्याची  प्रतिक्रिया शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन -राणे

मुंबई: आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना यांची युती झाल्यास मी भाजपमध्ये राहणार नाही, असे विधान  खासदार नारायण राणे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात माझा प्रथम क्रमांकाचा शत्रू हा शिवसेना असून जर भाजपने त्यांच्याबरोबर युती केली तर मी भाजपमध्ये नसेन, असे राणे यांनी मुलाखतीत सांगितले.

इतक्या प्राण्यांची नावे भाजपच्या नेत्यांनी महामेळाव्यात घेतली की त्यातून नेमका विचार काय द्यायचा होता तेच कळले नाही. कालपर्यंत काँग्रेसचे नेते अशा प्रकारे प्राण्यांची नावे घेऊन विरोधकांवर टीका करायचे. आता भाजपने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवायचे काम चालवलेले दिसते. लोकशाहीत विरोधी पक्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे.

 – संजय राऊत, शिवसेना नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 4:23 am

Web Title: mp sanjay raut talk on amit shah statement about alliance with shiv sena
Next Stories
1 प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी मुख्य आरोपीचे वर्षभर प्रयत्न
2 पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
3 नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही यंदापासून फेरपरीक्षेची संधी
Just Now!
X