मतदानाच्या काळात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांप्रमाणेच राजस्थान, हरियाना, पश्चिम बंगाल, पंजाब आणि  दक्षिण भारतातील मूळ रहिवाशांनी मतदान करून मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या प्रांतात जाण्याचे आवाहन करावे, अशा सूचना सोमवार १० फेब्रुवारी रोजी ठाण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यातील भाषणात पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्या होत्या. तसेच भैय्या हा उल्लेख आम्ही केला नसून आमच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
एखाद्या प्रांतातील नागरिकांना भय्या म्हणून संबोधणे ही प्रवृत्ती वाईट आहे. कोकण तसेच राज्याच्या इतर भागांतील मूळ रहिवासी सुट्टीनिमित्ताने मूळ गावी गेल्यास मतदानासाठी ते परत येऊ शकतात. परंतु परराज्यातील रहिवाशांना असे करणे जमेलच असे नाही. त्यामुळे त्यांनी मतदान करूनच गावी जावे, असे आवाहन आम्ही केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे मान्य करणारे उत्तर भारतीय, बिहारी, राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल, पंजाब, दाक्षिणात्य अशा देशातील सर्व प्रांतांतील बांधव राष्ट्रवादीला समर्थन आणि मतदान करतात, त्यामुळे त्यांना मतदान केल्यानंतरच गावी जाण्याची सूचना आम्ही कार्यकर्त्यांना केली होती. तसेच भय्या या शब्दाचा वापर आम्ही केला नाही.
देशातील सर्व प्रांतांतील नागरिकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य असून रेल्वे तिकिटे मिळविताना नागरिकांना काही अडचणी आल्यास मदत करण्याचे आवाहन आम्ही कार्यकर्त्यांना केले होते, असे नाईक यांचे म्हणणे आहे.