कायदा-सुव्यवस्थेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीचा युती सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर शुक्रवारी जोरदार टीका केली. चेंबूर येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना भेटून केली. तर, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

चेंबूर येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या धक्क्य़ाने आजारी पडलेल्या मुलीचा औरंगाबाद येथे रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवूनही आरोपींवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर  निदर्शने केली.

या प्रकरणाचा निषेध म्हणून तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, आमदार विद्या चव्हाण आदींनी पोलीस महासंचालक जयस्वाल यांची भेट घेऊन ओरोपींना तातडीनेअटक करण्याची तसेच, त्या मुलीच्या नातेवाईकांना संरक्षण देण्याची मागणी केली.

राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करून महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी विनंती करणारे निवेदन खासदार सुळे यांनी पोलीस महासंचकांना दिले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी चेंबूर सामूहिक बलात्कार प्ररणावरुन राज्यात कायदा व सुव्यस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप केला. बलात्काराचा गुन्हा महिनाभरापूर्वी दाखल होऊनही आरोपींनाअटक करण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार संताप आणणारा असून स्थानिक पोलिसांची भूमिका पाहता या प्रकरणाची सीआडीमार्फत करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

आरोपींना त्वरित अटक करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

चेंबूर येथे जालन्यातील एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. तपासाबाबत कोणती पावले टाकली, यासंदर्भात शनिवारी दुपापर्यंत आयोगाला अहवाल सादर करण्याच्याही सूचना आयोगाने दिल्या आहेत. या तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या तरुणीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर या तरुणीच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून  भरपाई देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आयोगाने पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत.