निधीतून केवळ एका डब्याचा खर्च

मुंबईत गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून पडून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लोकलच्या स्वयंचलित दारांसाठी पुढाकार घेतला आहे. खासदार फंडातून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्वासन सोमय्या यांनी शनिवारी रेल्वेच्या बैठकीत दिले. मात्र सोमय्या यांनी देऊ केलेल्या निधीतून स्वयंचलित लोकलचा अवघा एकच डब्याचा खर्च निघणार असल्याने रेल्वे संघटनेकडून टीका केली जात आहे.
मध्य रेल्वेवर रोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. याप्रवाशांसाठी रेल्वेकडून दिवसभरात १६०० हून अधिक फेऱ्यां चालवल्या जातात. या फेऱ्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १२१ लोकल गाडय़ा आहेत. यात नऊ आणि बारा डब्यांच्या गाडय़ांचा समावेश आहे. यात एका बारा डब्यांच्या लोकलला स्वयंचलित दार बसवण्यासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर सर्व लोकलची दारे स्वयंचलित करण्यासाठी १ हजारांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे खासदारांनी केवळ एका स्वयंचलित डब्याचा खर्च उचलण्याची कृती खूपच कमी असल्याची टीका यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली. खासदारांचा पुढाकार कौतुकास्पद असले तरी अशा प्रकारच्या तुटपुंज्या मदतीने प्रश्न सुटणार नसल्याचे गुप्ता म्हणाले. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिग्रेडिअर सुनीलकुमार सूद यांच्या सोबत झालेल्या बैठकीत स्वयंचलित लोकल प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले होते.