राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आता साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ते हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या या प्रयत्नांना जर यश आले तर शरद पवारांना हा मोठा धक्का असू शकतो. शिवाय हक्काचा सातारा जिल्हा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्यात जमा होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांबरोबर मंगळवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याचे एबीपी माझाकडून सांगण्यात आले आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची देखील उदयनराजेंची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या अगोदरच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने सातारमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. त्यात आता जर उदयनराजे भोसले यांनी असा काही निर्णय घेतला तर सातारमधुन राष्ट्रवादी जवळपास हद्दपारच होऊ शकते. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या संकेतावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.