विद्यापीठ अनुदान आयोगाकडून श्रेयांक विषयाची रचना

मुंबई : संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘संशोधन आणि प्रकाशनाची नीतिमूल्ये’ या विषयावरील अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. संशोधनातील शिस्तीबाबत एमफिल, पीएचडीच्या पूर्व अभ्यासक्रमात (कोर्स वर्क) समावेश करण्यात येणार असून पुढील टप्प्यांत पदव्युत्तर अभ्यासक्रमातही या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

दुसऱ्याच्या प्रबंधातील मजकूर वापरणे, इंटरनेटवरील उपलब्ध माहिती तंतोतंत वापरून प्रबंध लिहिणे, बोगस संशोधन, नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करणे, दुसऱ्याकडून प्रबंध लिहून घेणे असे गैरप्रकार राज्यातील विद्यापीठांत उघडकीस येऊ लागले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आता विद्यार्थ्यांना ‘संशोधन आणि प्रकाशनाची नीतिमूल्ये’ या विषयाचा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे. या विषयासाठी दोन श्रेयांकही देण्यात येणार असून त्याचा अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांनी त्याचा कोर्सवर्कमध्ये समावेश करायचा आहे. पुढील टप्प्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हा विषय बंधनकारक करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियोजन आहे.

संबंधित विषयांत पीएचडी केलेले आणि दहा वर्षे अध्यापनाचा अनुभव असणारे प्राध्यापक हा विषय शिकवू शकतील. वर्गातील अध्यापन, समूह चर्चा, तज्ज्ञांचे व्याख्यान, प्रात्यक्षिक असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल. वर्षांच्या अखेरीस लेखी परीक्षा आणि वर्षभर चाचण्या आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येईल.

प्रत्येक विद्यापीठ एमफिल आणि पीएचडी कोर्सवर्क निश्चित करते. त्यामध्ये भाषा, लेखनकौशल्ये, संशोधनपद्धती अशा घटकांचा समावेश असतो. मात्र संशोधनातील शिस्त राखण्यावर फारसा भर दिला जात नाही. त्यामुळे स्वतंत्र विषय म्हणून समावेश करण्याचा निर्णय आयोगाच्या ऑगस्टमध्ये झालेल्या ५४३ व्या बैठकीत घेण्यात आला होता, अशी माहिती आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली.

अभ्यासक्रमात काय? : संशोधनाची नीतिमूल्ये, शोधनिबंध प्रकाशित करताना पाळावयाची शिस्त, दुसऱ्याच्या संशोधनाचा आदर राखणे, वाङ्मयचौर्य टाळणे, वैचारिक प्रामाणिकपणा, शोधनिबंधातील गैरप्रकार, शोधनिबंध प्रकाशित करतानाचे उत्तम निकष अशा मुद्दय़ांचा समावेश आहे. सहा घटकांमध्ये या मुद्दय़ांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.