News Flash

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आमदार, खासदारांनी घेतली भुजबळांची भेट- ईडी

आठ दिवसांमध्ये २६ जणांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती

छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बॉम्बे रुग्णालयात असताना २६ लोकांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये आमदार, खासदारांचा समावेश आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून ही माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अटकेत असलेल्या आरोपीची भेट घेताना परवानगी आवश्यक असते. मात्र भुजबळ बॉम्बे रुग्णालयात असताना त्यांची तब्बल २६ जणांनी भेट घेतली. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र याचा भुजबळांकडून गैरवापर करण्यात आल्याचे दिसून येते आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी, नाशिकमधील विश्वास को-ऑपरेशन बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, पंकज भुजबळ आणि कुटुंबीयांनी भुजबळांची बॉम्बे रुग्णालयात भेट घेतली. त्यामुळे आता या सगळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २९ नोव्हेंबरच्या कालावधीत तब्बल २६ जणांनी भुजबळांची भेट घेतली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या प्रकृतीविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ हे क्रिकेटपटू विराट कोहलीइतके तंदुरुस्त आहेत, असे म्हणत दमानिया यांनी भुजबळांवर वैद्यकीय उपचार करणारे पथकच बदलण्यात यावे, अशी मागणी केली आहे. नाशिकमधील विश्वास को-ऑपरेशन बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी भुजबळांची भेट घेतल्याबद्दलही दमानिया यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘नोटाबंदीच्या निर्णयानंतर विश्वास ठाकूर यांनी भेट घेणे भुवया उंचवणारे आहे,’ असे दमानिया यांनी म्हटले आहे.

बेहिशेबी मालमत्ता, दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिनातील भूखंड प्रकरण असे अनेक गैरव्यवहारांचे आरोप छगन भुजबळ यांच्यावर आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ तुरुंगात आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे भुजबळ जे जे रुग्णालयात दाखल झाले. मात्र जे जे रुग्णालयात काही वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांनी ८ दिवसांमध्ये २६ जणांची भेट घेतली. यामध्ये अनेक आमदार, खासदारांचा समावेश असल्याने आता या भेटींची चौकशी होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 12:59 pm

Web Title: mps mlas visited chhagan bhujbal in hospital says ed
Next Stories
1 मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने
2 महिलांसाठी रेल्वे असुरक्षितच!
3 ‘आरे’च्या हरितपट्टय़ाला अतिक्रमणांचे ग्रहण
Just Now!
X