महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. विधीमंडळात मुख्यमंत्री आणि विरोधकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या सात एप्रिलला ही परीक्षा घेण्यात येणार होती. आता ही परीक्षा मेमध्ये घेण्यात येईल. त्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 
आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती परीक्षेच्या तोंडावरच नष्ट झाली होती. राज्यभरात २६५ पदांसाठी ९८४ केंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी आपली माहिती पुन्हा आयोगाच्या वेबसाईटवर द्यावी, अशा सूचना दोन दिवसांपूर्वी देण्यात आल्या होता. मात्र, इतक्या कमी कालावधीत अर्ज पु्न्हा भरणे अशक्य असल्याचा सूर सर्वस्तरांतून उमटत होता. अर्ज केलेल्या सव्वातीन लाख उमेदवारांपैकी दोन लाख उमेदवारांची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत अपडेट झाली होती.
परीक्षा पुढे ढकलायची का, याबाबत गुरुवारी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले होते. लोकसेवा आयोग येत्या सात तारखेलाचा परीक्षा घेण्यावर ठाम होता.