नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये ओढला गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू या तरुणाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये अंतरिम भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला दिले.

रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीमुळे मारू याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाकडून ही निष्काळजी झाली नसती, तर हा प्रकार घडला नसता, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने मारू याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्याचे आदेश पालिकेला दिले.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एमआरआय मशीनमध्ये ओढला गेल्याने राजेशचा अपघाती मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका नातेवाईकाला पाहण्यासाठी राजेश रुग्णालयात गेला होता. त्याच दिवशी त्या नातेवाईकाला एमआरआय करण्यास सांगण्यात आले. रुग्णालयातच एमआरआयची खोली आहे. नातेवाइकाला त्या खोलीत नेल्यानंतर राजेश बाहेर प्रतीक्षा कक्षात बसला होता. त्या वेळी रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने त्याला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन एमआरआय मशीन असलेल्या खोलीत जाण्यास सांगितले. एमआरआय मशीन बंद असल्याने कसलाही धोका नसल्याचेही त्याला सांगण्यात आले. मात्र सिलिंडर घेऊन राजेश खोलीत दाखल होताच सुरू असलेल्या एमआरआय मशीनमध्ये तो ऑक्सिजन सिलिंडरसह ओढला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. याचिकेवरील अंतिम सुनावणी होईपर्यंत पालिकेने १० लाख रुपयांच्या अंतरिम भरपाईची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत पाच वर्षांसाठी ठेवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

‘रुग्णालयाकडून निष्काळजीपणा’

रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीमुळे मारू याचा मृत्यू झाला, असे  न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने यावेळी नमूद केले.