मुंबईच्या नायर रुग्णालयात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून यामध्ये एका व्यक्तीचा एमआरआय मशीनमध्ये विचित्रप्रकारे मृत्यू झाला आहे. ही मशीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक असल्याने या व्यक्तीजवळ असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरला मशीनने आपल्याकडे आकर्षित केल्याने त्यातील गॅस बाहेर पडून तो त्या व्यक्तीच्या पोटात पसरला. त्यानंतर रुग्णाचे पोट फुगू लागले आणि अक्षरशः त्याचे डोळे बाहेर आले. त्यानंतर त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात भादंवि कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश मारू (वय ३२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेशचे मेव्हणे हरीश सोलंकी यांनी सांगितले की, त्याच्या आईची प्रकृती ठीक नव्हती. यासाठी त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना आपल्या आईचा एमआयआर करण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर राजेशही रुमपर्यंत जाणार होता.

एमआयआर रुमच्या बाहेर वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षेसाठी काढून घेतले होते. मात्र, रुग्णासाठी जवळ असलेला ऑक्सिजन सिलेंडर त्याला आत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्याने विरोध केला मात्र, वॉर्डबॉयने सांगितले की एमआरआय मशीन बंद असून अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. त्यानंतर राजेश रुममध्ये गेला आणि एमआरआय मशिनने तत्काळ सिलेंडरला आपल्याकडे खेचून घेतले. सिलेंडरला पकडून राजेशही या मशिनमध्ये अडकला गेला. त्याचवेळी उच्च दाबामुळे त्या सिलेंडरचे झाकण उघडले गेले आणि त्यातील संपूर्ण वायू हा राजेशच्या पोटात गेला. हरीशने सांगितले की, वॉर्डबॉयच्या मदतीने त्यांनी राजेशला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेरही काढण्यात आले आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या सर्व विचित्र प्रकाराचा अग्रीपाडा पोलीस तपास करीत आहेत. पोलीस मृताच्या नातेवाईकांबरोबरच रुग्णालयातील वॉर्डबॉय आणि टेक्निशिअनची देखील चौकशी करीत आहेत.