11 August 2020

News Flash

दूध, पिण्याचे पाणी, गॅस सिलेंडर; ‘एमआरपी’नुसार दर आकारणे बंधनकारक

एसटी स्थानक तसेच मॉल्समध्येही एमआरपीपेक्षा अधिक किंमत बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी आकारली जाते.

दूध, बाटलीबंद पिण्याचे पाणी, घरगुती गॅस सिलेंडर आदींसह कुठल्याही वस्तूवर व्यापाऱ्यांकडून वा तत्सम विक्रेत्यांकडून कमाल किरकोळ किमतीनुसार (एमआरपी) दर आकारला जात नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी एमआरपीपेक्षा अधिक किंमत अदा करू नये तसेच अशा विक्रेत्यांबाबत तक्रार करावी, असे आवाहन वैधमापन विभागाचे नवे नियंत्रक व पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
दुधाच्या पिशवीवरील छापील किमतीपेक्षा दोन ते चार रुपये जादा आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी वैधमापन विभागाकडे आल्या आहेत. यानुसार कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. दुधाच्या पिशवीवरील एमआरपीपेक्षा जादा किंमत आकारण्यापोटी दुधाची वाहतूक आणि ते थंड जागेत ठेवावे लागत असल्याचे कारण पुढे केले जात आहे; परंतु दुधाची किंमत या बाबी गृहीत धरूनच ठरविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क देऊ नये आणि वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही गुप्ता यांनी केले आहे.
रेल्वे स्थानक, एसटी स्थानक तसेच मॉल्समध्येही एमआरपीपेक्षा अधिक किंमत बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी आकारली जाते. हे चुकीचे असून याविरोधात मोहीम राबवून अशा साडेसातशे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या तक्रारींविरुद्ध अचानक छापे टाकून कारवाई करण्याचे आदेशही गुप्ता यांनी दिले आहेत. काही डिपार्टमेंटल स्टोअर्स तसेच दुकानांमध्येही एमआरपीपेक्षा अधिक किमतीने वस्तूची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा काही दुकानांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी वजनातही ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशा तक्रारींविरुद्धही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी वैधमापन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी ०२२-२२८८६६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2016 2:29 am

Web Title: mrp rate binding for milk drinking water and gas cylinder
टॅग Gas Cylinder
Next Stories
1 समलिंगी-समानता
2 आरेचे रुग्णालय पालिकेकडे हस्तांतरित
3 पीयूष देशपांडे आणि प्रणव आगाशे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X